मुंबई - राफेल लढाऊ विमान खरेदी प्रकरणी भ्रष्टाचार झाल्याचा आरोप सातत्याने फ्रांसच्या प्रसार माध्यमांमधून होत होता. त्या बातम्यांना आता दुजोरा मिळाला असून राफेल लढाऊ विमान खरेदी प्रकरणात मध्यस्थी करणाऱ्या व्यक्तीला 65 कोटी रुपये लाच दिली असल्याचे वृत्त फ्रांसमधून समोर येत आहे. ही गंभीर बाब असून याबाबत केंद्र सरकारने चौकशी केली पाहिजे. हळूहळू सर्व गोष्टी समोर येत असल्याने, केंद्र सरकारने त्वरित याबाबत चौकशी करणे गरजेचे असल्याचे पत्रकारांशी बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक म्हणाले आहेत.
काश्मीरची स्थिती अद्यापही सुधारलेली नाही
गेल्या दोन वर्षापासून जम्मू-काश्मीरवर केंद्र सरकारचे नियंत्रण आहे. मात्र, अद्यापही जम्मू-काश्मीरमधील परिस्थिती नियंत्रणात आलेली दिसत नाही. देशाचे गृहमंत्री अमित शहा स्वतः या सर्व भागाचा दौरा करत आहेत. मात्र, तरीही परिस्थिती बदलण्याचा नाव घेत नाही. आताही निरपराध लोकांना मारले जात आहे. दहशतवाद थांबलेला नाही. याचा अर्थ काश्मीरच्या मुद्द्यावर केंद्र सरकार पूर्णपणे अपयशी झाला असल्याची टीका नवाब मलिक त्यांनी केंद्र सरकारवर केली आहे.