मुंबई - राणा दाम्पत्यांना मुंबई उच्च न्यायालयाचा ( Mumbai High Court ) दिलासा मिळाला नसून न्यायालयाने एफआयआर रद्द करण्याची याचिका फेटाळली ( Mumbai HC on Rana Couple Petition ) आहे. राणा दाम्पत्यांना दुसऱ्या FIR मध्ये कारवाई करण्यापूर्वी 72 तास आधी कळवणे गरजेचे आहे असे आदेश न्यायालयाने पोलिसांना दिले आहे.
72 तास आधी नोटीस देणे बंधनकारक - राणा दांपत्याविरोधात दाखल झालेल्या दुसऱ्या एफआयआरच्या निमित्ताने आज उच्च न्यायालयात पुन्हा एकदा धाव घेतली. ही एफआयआर रद्द करून आयपीसी कलम ३५३ अंतर्गत पहिल्या एफआयआरमध्ये समाविष्ट करा एवढीच आमची मागणी असल्याचे राणा दांपत्याच्या वतीने कोर्टात सांगण्यात आले. जरी पहिल्या प्रकरणात जामीन मिळाला तरी दुसऱ्या प्रकरणात आम्हाला पुन्हा अटक करता यावी यासाठीच हा गुन्हा दाखल केला आहे. घटना एकच असताना दोन एफआयआर दाखल करणे चुकीचे असल्याचा युक्तीवाद राणा दांपत्याच्यावतीने करण्यात आला आहे. राणा दांपत्याचे वकील रिझवान मर्चंट यांनी उच्च न्यायालयात हा युक्तीवाद केला. पण राणा दांपत्याची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली. दोन्ही वेगवेगळ्या घटना आहेत. त्यामुळे वेगवेगळे गुन्हे दाखल होणे आवश्यक असल्याचे मत कोर्टाने मांडले. मात्र दुसऱ्या एफआयआरमध्ये कारवाईपूर्वी आरोपींना 72 तास आधी नोटीस देणे बंधनकारक असल्याचेही कोर्टाने स्पष्ट केले आहे.
आम्ही 353 कलम लावण्याजोगे कोणतेही कृत्य केले नाही - कलम रद्द करण्याची आमची मागणी नाही. ही एफआयआर रद्द करून आयपीसी कलम ३५३ पहिल्या एफआयआरमध्ये समाविष्ट करा ही मागणी राणा दांपत्यांच्या वकिलांनी केली आहे. जर कोर्टाकडे हे प्रकरण सविस्तर वाचण्यासाठी वेळ नसेल तर पुढची तारीख द्या अशीही मागणी यावेळी करण्यात आली. तोपर्यंत कलम 353 अंतर्गत कारवाईपासून संरक्षण द्या अशीही मागणी राणा दांपत्याच्यावतीने करण्यात आली. घटना एकच असताना दोन एफआयआर दाखल करणे चुकीचे आहे. सीसीटीव्ही फुजेमधून स्पष्ट होईल की 353 कलम लावण्याजोगे कोणतेही कृत्य केलेले नाही.