महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Parab Vs Kadam : पक्षांतर्गत खदखद वाढवणार शिवसेनेची डोकेदुखी.. कदम-परब संघर्षात पक्षाची कोंडी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेतील अंतर्गत खदखद पक्षासाठी डोकेदुखी ठरत आहे. मागील काही दिवसापासून ओबीसी आरक्षणाचा पेच, पेपर फुटी आदी प्रकरणांना सामोरे जाताना महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांची चांगलीच दमछाक होत आहे. अशातच शिवसेना नेते रामदास कदम यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर (Ramdas Kadam and Anil Parab clash) आरोप करताना थेट मातोश्रीला आव्हान दिले आहे. यामुळे शिवसेनेची कोंडी झाली आहे.

Parab Vs Kadam
Parab Vs Kadam

By

Published : Dec 19, 2021, 8:22 PM IST

मुंबई - मागील काही दिवसापासून ओबीसी आरक्षणाचा पेच, पेपर फुटी आदी प्रकरणांना सामोरे जाताना महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांची चांगलीच दमछाक होत आहे. अशातच शिवसेना नेते रामदास कदम यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर (Ramdas Kadam and Anil Parab clash ) आरोप करताना थेट मातोश्रीला आव्हान दिले आहे. शिवसेनेची यामुळे डोकेदुखी वाढली असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर अंतर्गत धुसफूस चव्हाट्यावर आल्याने शिवसेनेची कोंडी झाली आहे.

पक्षप्रमुख काय भूमिका घेणार -

बाळासाहेबांचे खंदे समर्थक, कडवट शिवसैनिक, पहिल्या फळीतील नेता, शिवसेनेची एकेकाळची तोफ म्हणून रामदास कदम यांची ओळख आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात तळागाळात शिवसेनेचे बीज रोवण्याचे काम रामदास कदम यांनी केले आहे. परंतु, गेल्या वर्षांपासून कदम शिवसेनेवर नाराज असल्याची चर्चा होती. रत्नागिरी जिल्ह्यात कदम यांचा दांडगा जनसंपर्क आहे. दापोली - मंडणगड- खेड, चिपळूण, गुहागर या मतदारसंघात कदम यांचे वर्चस्व आहे. अशातच कदम यांनी केलेल्या गंभीर आरोपामुळे शिवसेनेत मोठी दुफळी माजली आहे. आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवता, शिवसेना पक्षप्रमुख याबाबत काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

रामदास कदम गेल्या काही महिन्यांपासून शिवसेनेवर नाराज होते. अनिल परब यांना रत्नागिरी जिल्ह्याचे (Ramdas Kadam and Anil Parab clash ) पालकमंत्री केल्यानंतर त्यात अधिक भर पडली. विधान परिषदेत त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या समोर आपली खदखद अनेकदा बोलून दाखवली. दरम्यान, भाजप नेते किरीट सोमय्यांना परिवहन मंत्री अनिल परब यांच्या दापोलीतील रिसॉर्ट प्रकरणात रामदास कदम यांनी रसद पुरवल्याची ऑडिओ क्लिप बाहेर आली. या प्रकरणी कदम चांगलेच अडचणीत आले होते. मातोश्रीकडून याबाबत खुलासा मागवत दरवाजे बंद करण्यात आले. त्यामुळे शिवसेनेच्या बैठकांना कदम गैरहजर राहू लागले. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यात ते अनुपस्थित राहिल्याने चर्चेचा विषय बनला. अशातच विधान परिषद सदस्यपदाचा रामदास कदम यांचा कालावधी संपला. पक्षविरोधी घेतलेल्या भूमिकेमुळे कदमांना संधी न देता शिवसैनिक सुनील शिंदेंची वर्णी लावली. त्यामुळे रामदास कदम प्रचंड नाराज होते. या प्रकरणाचा कधी तरी स्फोट होईल, अशी शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात होती.

हे ही वाचा -Kadam Vs Parab : गद्दार कोण मी.. की अनिल परब? रामदास कदम यांचा सवाल

बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृती स्थळावरती ही कदम यांनी या संदर्भात खुलासा करणार असल्याचे संकेत दिले होते. अखेर पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेच्या गोटातील नाराजी चव्हाट्यावर आणली. परिवहन मंत्री अनिल परब, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री यांच्यावर शिवसेना स्टाईलने सडकून टीका केली. शिवाय, लवकरच वेगळी भूमिका घेतली जाईल, असे संकेत दिले आहेत. शिवसेनेत कदम हे मोठे नेते आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत याचे परिणाम दिसतील, असे मत राजकीय विश्लेषक श्रीरंग सुर्वे वर्तवतात. तसेच भाजपला रोखण्यासाठी पक्षातील मतभेद मिटवून शिवसेना पक्षप्रमुखानी मूठ बांधणीवर भर द्यायला हवा, असेही विश्लेषकांचे म्हणणे आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात मतभेद -

रत्नागिरी जिल्ह्यातील राजकारणात राष्ट्रवादीतून भास्कर जाधव स्वगृही परतल्याने शिवसेनेची ताकद वाढली आहे. परंतु, भास्कर जाधव आणि रामदास कदम यांच्यात विस्तव जात नसल्याने पक्षांतर्गत धुसफूस (Ramdas Kadam and Anil Parab clash) वाढली आहे. जिल्हा परिषद, नगरपरिषदेच्या सदस्यांमध्ये एकमत नाही. रामदास कदम समर्थक पक्ष आदेशाला जुमानत नाहीत. पालकमंत्री अनिल परब मुंबईत तळ ठोकून असतात. त्यामुळे कुरघोडीचे वाढली असून चिपळूण, गुहागर, खेड आणि रत्नागिरीत चढाओढ लागली आहे. नुकत्याच झालेल्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या. रामदास कदम गोटातील समर्थकांना यावेळी बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील राजकारणाच्या नाराजीत अधिक भर पडल्याचे बोलले जाते.

मुख्यमंत्री ठाकरे यांच्याशी बोलणार -

शिवसेनेचे मंत्री अनिल परब आणि उदय सामंत हे राष्ट्रवादी काँग्रेसशी संधान साधून शिवसेनेला संपवण्याचा (Ramdas Kadam and Anil Parab clash ) प्रयत्न करीत आहेत. नगरपंचायत निवडणुकीत माझ्या मुलाला डावण्यासाठी राष्ट्रवादीच्या संजय कदम यांना मातोश्रीवर आले होते. मात्र उद्धव ठाकरेंनी त्याच न ऐकता, माझ्या मुलाला तिकीट दिला. अनिल परब यांच्या मनात हाच राग असून ते माझी राजकीय कारकीर्द संपवण्याचा काम करत असल्याचा आरोप रामदास कदम यांनी केला. अनिल परब राष्ट्रवादीचे नेते असल्यासारखे बोलतात. पक्षाशी निष्ठावान राहूनही डावलले जात असेल तर माझ्या पुढील राजकीय भवितव्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलून निर्णय घेणार असल्याचे कदम यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.

..तर भाजपची पकड मजबूत होणार -

शिवसेनेची नाळ नेहमी कोकणाशी जुळलेली आहे. कोकणातील विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे सर्वाधिक आमदार आहेत. भाजपने येथे वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी नारायण राणे यांना केंद्रीय मंत्रिपद बहाल केले आहे. मात्र रत्नागिरी मतदारसंघावर शिवसेनेचा पगडा आहे. त्यामुळे शिवसेनेतील नाराजांना गोंजारण्याचे प्रयत्न नारायण राणे यांच्या माध्यमातून सुरू झालेले आहेत. आतापर्यंत रामदास कदम यांच्यासहित शिवसेनेतील दीपक केसरकर आणि अनंत गीते हे नेते भाजपच्या गळाला लागल्याची जोरदार चर्चा आहे. अद्याप याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. मात्र तिन्ही नेते भाजपमध्ये गेल्यास सिंधुदुर्ग ते रायगडपर्यंत त्यांची पकड मजबूत होणार आहे.

राज्य सरकार बॅकफूटवर -

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत. नुकतेच सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी आरक्षणा संदर्भातील निकाल देताना राज्य याचिका फेटाळून लावली. त्यातच निवडणूक आयोगाने ओबीसी आरक्षणाविना निवडणुका येत्या १८ जानेवारीला घेण्याचे जाहीर करत सरकारची (Local body election Shiv Sena in difficulty) कोंडी केली आहे. चार महापालिकांच्या रिक्त जागा, ४५५४ ग्रामपंचायतीतील ७१३० रिक्त पदे ओबीसी आरक्षण विना होणार असल्याने राज्य सरकार बॅकफूटवर गेले आहे. अशातच शिवसेनेतील पक्षांतर्गत खदखद समोर आल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर अडचणी वाढणार आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details