मुंबई - राजस्थानमध्ये सत्तास्थापनेकरता बहुमतासाठी 101 आमदारांची गरज आहे. सचिन पायलट यांनी 30 आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे. भाजपकडे 78 आमदारांचे संख्याबळ आहे. त्यामुळे एकूण 108 आमदारांच्या बळावर राजस्थानात भाजपचे सरकार स्थापन होऊ शकते, असा दावा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी केला आहे.
केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले हे त्यांच्या खास शैलीतील विधानांमुळे आणि राजकीय अंदाजावरील भाष्यामुळे नेहमी चर्चेत असतात. राजस्थानातील राजकीय नाट्यमय घडामोडीवरही त्यांनी आपले मत व्यक्त केले आहे. ते म्हणाले, की सचिन पायलट यांनी राजस्थानच्या उपमुख्यमंत्रीपदाचा आणि काँग्रेसच्या राजस्थान प्रदेश अध्यक्षपदाचा राजीनामा देऊन काँग्रेस सोडण्याचा घेतलेला निर्णय योग्य आहे. त्यांच्या या निर्णयाचे आम्ही स्वागत करीत आहोत.