मुंबई :पालघर साधू हत्याकांडाला २११ दिवस झाले, तरीही याप्रकरणी न्याय मिळाला नाही. त्यामुळे हे प्रकरण सीबीआयकडे देण्याची मागणी करत राम कदमांनी आज (बुधवारी) जन आक्रोश पदयात्रा काढण्याचे जाहीर केले होते. या पदयात्रेनंतर उपोषणाला बसण्याचाही राम कदम यांनी इशारा दिला होता. मात्र, या यात्रेला परवानगी नसल्यामुळे, सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी राम कदमांना खारहून ताब्यात घेतले, आणि काही वेळानंतर त्यांना सोडून देण्यात आले. यानंतर राम कदमांनी आपला आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचे म्हणत राज्य सरकारवर टीका केली.
पालघर हत्याकांडाची चौकशी सीबीआयकडे द्या! जन-आक्रोश पदयात्रेस निघालेला भाजप आमदार पोलिसांच्या ताब्यात - संघर्षाची ठिणगी पेटली आहे..
सुटका झाल्यानंतर राम कदमांनी आता संघर्षाची ठिणगी पेटली असून, संघर्ष सुरूच राहील असे वक्तव्य केले आहे. या आंदोलनासाठी आणि उपोषणासाठी राज्य सरकारने परवानगी नाकारली. हे सरकार कुंभकर्ण आहे, त्यांना या समस्यांशी काहीही घेणे-देणे नाही. तसेच, राज्य सरकार सीबीआय चौकशीला घाबरत असल्याचे राम कदम म्हणाले.
संघर्षाची ठिणगी पेटली आहे - राम कदम - राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना वाचवण्याचा प्रयत्न..
पालघर मॉब लिंचिंगवेळी जमावामध्ये राष्ट्रवादीचे काही कार्यकर्तेही उपस्थित होते. त्यांना वाचवण्याचा प्रयत्न राज्य सरकार करत असल्याचा आरोप यावेळी राम कदमांनी केला.
- हिंदू धर्माविरोधात जाण्यासाठी शिवसेना सत्तेत गेली..
दरम्यान, राम कदमांना भेटण्यासाठी नारायण राणेही खार पोलीस ठाण्यात उपस्थित होते. हिंदू धर्माविरोधात जाण्यासाठीच भाजपसोबत गद्दारी करुन शिवसेना सत्तेत गेली आहे. त्यांचे हिंदुत्व आता गळून पडले असून, त्यांना साधू संतांबाबत काहीही पडले नाही. मात्र, साधू-संतांवरील अत्याचार थांबले पाहिजेत, आणि पालघरमधील बळींना न्याय मिळायला हवा यासाठी आम्ही राम कदमांच्या आंदोलनाला समर्थन देत आहोत, असे मत नारायण राणे यांनी व्यक्त केले.
हिंदू धर्माविरोधात जाण्यासाठी शिवसेना सत्तेत गेली - नारायण राणे - गडचिंचले येथे भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात..
राम कदम यांच्यासोबत गडचिंचले येथे जाऊन आंदोलन करण्याच्या पवित्र्यात असलेला पालघर जिल्ह्यातील भारतीय जनता पक्षाच्या सहा कार्यकर्त्यांना देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. भाजपचे पालघर जिल्हा अध्यक्ष नंदकुमार पाटील, जिल्हा संघटन सरचिटणीस संतोषजी जनाठे, सुजित पाटील, सुशील औसरकर, संतोष गिंभळ, हर्षद पाटील या कार्यकर्त्यांना पोलिसांनी मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मनोर येथे ताब्यात घेतले.
पालघरमध्ये झालेल्या साधूंच्या हत्याकांड प्रकरणाला कोणताही धार्मिक अँगल नसल्याचे गुन्हे शाखेने कोर्टात सादर केलेल्या आरोपपत्रात नमूद करण्यात आलं आहे. त्यामुळे भाजपने या मुद्द्यावरून राज्यसरकारवर टीका केली होती, तसेच हे प्रकरण सीबीआयकडे देण्याची मागणी केली होती. सुरुवातीपासूनच साधू हत्याकांडावरून भाजप आक्रमक झालेले पहायला मिळत आहे. "भगव्याला गुंडाळून ठेवणारा पक्षच जर सत्तेत असेल, तर भगव्या वस्त्रातील साधूंना न्याय कसा मिळणार?" असा देखील सवाल भाजपने अगोदर टीका करत केला होता. यानंतर राम कदमांनी पालघर हत्याकांड आम्ही विसरलेलो नाही, असं म्हणत त्या प्रकरणाची चौकशी व्हावी यासाठी आम्ही आक्रोश यात्रा काढणार असे सांगितले होते.
- कदमांना पोलिसांनी घेतले ताब्यात..
या पार्श्वभूमीवर राम कदमांच्या घराबाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस तैनात करण्यात आले होते. पदयात्रेसाठी म्हणून राम कदम घराबाहेर पडताच, पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. यानंतर कदम यांनी ट्विटरवरुन राज्य सरकारवर निशाणा साधला. आम्हाला पालघरला जाण्यापासून तुम्ही अडवत आहात, आणखी कोणा-कोणाचे आवाज दाबण्याचा प्रयत्न तुम्ही कराल? अशा आशयाचे ट्विट त्यांनी राज्य सरकारला उद्देशून लिहिले आहे.
- आता साधू रस्त्यावर येतील..
हत्याकांड झाले तेव्हा देशभरात कोरोनामुळे लॉकडाऊन लागू करण्यात आले होते. त्यामुळे देशभरातील साधू आपला आक्रोश दाखवण्यासाठी रस्त्यावर येऊ शकले नाहीत. मात्र, आता अनलॉक सुरू असल्यामुळे मोठ्या प्रमाणात साधू-संत रस्त्यावर आलेले पहायला मिळतील, असे कदम यावेळी म्हणाले.
एप्रिल महिन्याच्या १६ तारखेला पालघरमधील गडचिंचोले गावात महंत कल्पवृक्षगिरी महाराज, सुशीलगिरी महाराज या दोन साधूंसह त्यांचा कार चालक नीलेश तेलगडे याची जमावाने लाठ्याकाठ्या आणि दगडाने ठेचून हत्या केली होती. या प्रकरणामुळे देशभरात राजकीय वादळ सुरु झाले होते. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारवर त्यानंतर जोरदार टीका झाली होती. तसेच, विश्व हिंदू परिषदेने सीआयडी चौकशीची मागणी केली होती. त्यानंतर राज्य सरकारने या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेकडे सोपवला होता.