Rajya Sabha Election 2022 :मुंबई - राज्यसभेतील 57 खासदारांचा कार्यकाल नुकताच संपला आहेत. या जागांसाठी निवडणूक आयोगाने निवडणुकीचे आयोजन केले आहे. यात महाराष्ट्रातील राज्यसभेवरील सहा जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. 31 मे पर्यंत राज्यसभेच्या सदस्य पदासाठी अर्ज भरण्याची अंतिम तारीख आहे, तर 10 जून रोजी यासाठी मतदान होईल.
या खासदारांचा संपला कार्यकाळ - शिवसेनेचे खासदार संजय राऊत, राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार प्रफुल पटेल, काँग्रेसकडून पी. चिदंबरम यांची मुदत संपत आहे. तसेच भारतीय जनता पक्षाकडून विनय सहस्त्रबुद्धे, पियुष गोयल आणि विकास महात्मे या तीन राज्यसभेवरील खासदारांचे मुदत संपत आहे. त्यामुळे 'या' सहा जागांवर निवडणूक जाहीर करण्यात आली आहे.
पुन्हा संधी मिळण्याची शक्यता - राज्यसभेसाठी 15 राज्यातून एकूण 57 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. त्यामुळे शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि भारतीय जनता पक्षाकडून पुन्हा एकदा कोणत्या खासदाराला संधी दिली जाते. याबाबतच्या चर्चा देखील राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत. यामध्ये शिवसेनेकडून संजय राऊत आणि राष्ट्रवादीकडून प्रफुल पटेल तसेच भारतीय जनता पक्षाकडून पियुष गोयल यांना पुन्हा संधी मिळणार असल्याचे जवळपास निश्चित आहे.