मुंबई - राज्यसभा निवडणुकीसाठी (Rajya Sabha Election 2022) अवघ्या चार दिवसांचा शिल्लक राहिला असताना राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिवसेनेने (Shivsena) तिसऱ्या आणि राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरूवात केली आहे. आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी वर्षा बंगल्यावर आमदारांची बैठक बोलावली होती. या बैठकीत राज्यसभेच्या निवडणुकीत ही रणनीती आखण्यात आली असून आमदारांना हॉटेलमध्ये ठेवले जाणार आहे. दगाफटका टाळण्यासाठी ही खबरदारी घेण्यात आली आहे.
हेही वाचा -State Cabinate Meeting : आजच्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीतील महत्त्वाचे निर्णय, वाचा सविस्तर....
आमदारांसाठी हॉटेल मॅनेजमेंट -राज्यसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी सरकारच्या एकूण संख्याबळावर चार उमेदवार निवडून आले असते. भाजपने सहावा उमेदवार दिल्याने शिवसेनेपुढे आव्हान उभे राहिले आहे. सहावा उमेदवार निवडून येण्यासाठी छोटे पक्ष आणि अपक्ष आमदारांची आवश्यकता आहे. या आमदारांना गळाला लावण्याच्या हालचाली भाजपने सुरू केल्या. नाराज आमदारांची मनधरणी करून सहावा उमेदवार निवडून आणण्याची भाजपची रणनीती आहे. परंतु, आघाडी सरकार स्थापन होण्यापूर्वी छोटे पक्ष आणि आमदारांनी पाठिंबा दिला होता. हे आमदार फुटू नयेत यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी वर्षा बंगल्यावर शिवसेना आमदार, शिवसेना समर्थक लहान पक्ष आणि अपक्ष आमदार बैठक बोलावली होती. तर, मेळघाटचे अपक्ष आमदार वर्षावर दाखल झाले आहे. वर्षावर सेनेचे जवळपास 35 ते 40 आणि 1 अपक्ष उपस्थित होते. या बैठकीनंतर उपस्थित सर्व आमदारांना मालाड येथील हॉटेल रिट्रीट येथे ठेवण्यात येणार आहे.