मुंबई - विरार येथे असलेल्या विजय वल्लभ रुग्णालयाला लागलेल्या आगीत 14 रुग्णांचा आपला जीव गमवावा लागला. या घटनेवर प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देत असताना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी "ही घटना राष्ट्रीय बातमी नाही" असं वक्तव्य केलं होतं. मात्र मला असं म्हणायचं नव्हतं, माझ्या शब्दांचा विपर्यास केला गेला आहे. माझं व्यक्तिमत्त्व संवेदनशील आहे. माझ्यावर कोसळलेल्या दु:खद प्रसंगातही काम केलं आहे. सर्वसामान्य लोकांना त्रास हाऊ नये, अशी इच्छा असते असे स्पष्टीकरण आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिले.
प्रसारमाध्यमांनी व्यक्ती कोण, त्यांचे विचार आणि व्यक्तिमत्त्व तरी समजून घ्यावे-
आज सकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत असलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सला निघत असताना काही प्रसारमाध्यमांनी विरार मधील रुग्णालयाला लागलेल्या आगी संदर्भात प्रश्न केले. तसेच हा मुद्दा पंतप्रधानांच्या कानावर घालणार का? असा देखील प्रश्न केला. त्या प्रश्नाला उत्तर देत असताना, राज्यामध्ये सध्या सुरू असलेल्या ऑक्सीजनचा तुटवडा, रेमडेसिवीर इंजेक्शनचा तुटवडा आणि लसीकरण यासंदर्भात प्रधानमंत्र्यांशी चर्चा होणार आहे. मात्र विरार मधील रुग्णालयाला लागलेला आगीचा मुद्दा हा राष्ट्रीय बातमी नाही, तरी देखील हा मुद्दा पंतप्रधानांच्या कानावर घातला जाईल, अशा प्रकारचे मी वक्तव्य केलं होतं. तसेच रुग्णालयांच्या बांधकामबाबत तपासणी केली जाईल, असे सांगितले. मात्र प्रसारमाध्यमांनी व्यक्ती कोण, त्यांचे विचार आणि व्यक्तिमत्त्व तरी समजून घ्यावे. अंदाज बांधू नये, प्रत्येकाचे व्यक्तिमत्त्व ठरलेले असते अस राजेश टोपे यांच्याकडून सांगण्यात आले.
विरोधकांना मदतीचे आवाहन-
विरारमध्ये रूग्णालयात लागलेल्या आगीच्या संदर्भात आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी बेजबाबदार वक्तव्य केलं आहे. त्यामुळे विरोधकांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. मात्र, सध्याही राज्यामध्ये वाईट परिस्थिती आहे. इतर गोष्टींमध्ये लक्ष न देता राज्य सरकार आणि विरोधी पक्ष नेते यांनी एकत्र मिळून काम करणे गरजेचं असल्याचं सांगत विरोधी पक्ष नेत्यांना राज्य सरकार सोबत काम करण्याचं आवाहन आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केलं.
हेही वाचा -जीना मरना तेरे संग... विरार रुग्णालय आगीत पतीचा मृत्यू, वृत्त समजताच पत्नीचे हृदयविकाराने निधन