मुंबई -नायर रुग्णालयामधील एमआरआय मशीनमध्ये फेब्रुवारी 2018 मध्ये राजेश मारू (32) या व्यक्तीचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी आज सुनावणी होऊन मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला मृताच्या कुटुंबीयांना भरपाई म्हणून 10 लाख रुपये देण्याचे आदेश दिले आहेत.
राजेशचा मृत्यू झाल्यानंतर मृताच्या नातेवाईकांनी या प्रकरणी रुग्णालय प्रशासनाला जबाबदार धरुन उच्च न्यायालयात धाव घेतली. त्यावर न्यायालयाने निकाल देताना मारू कुटुंबीयांना 10 लाख रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश देत ५ लाख रुपये फिक्स्ड् डिपॉझिटमध्ये ठेवावेत आणि उर्वरित रोख द्यावे, असे सांगितले.
हेही वाचा - रेल्वे पोलिसांनी वाचवले वृद्धाचे प्राण; खेड रेल्वे स्थानकावरील घटना
काय आहे प्रकरण -
फेब्रुवारी 2018 ला राजेश मारुती मारू हा नायर रुग्णालयातील एमआरआय विभागात आपल्या आईचा एमआरआय काढण्यासाठी गेला होता. दरम्यान, राजेश हा एमआरआय सेंटरमध्ये ऑक्सिजन सिलेंडरसह रुममध्ये गेला असता एमआरआय मशीनने ऑक्सिजन सिलेंडर खेचून घेतला. त्यानंतर राजेश ऑक्सिजन सिलेंडर काढण्यासाठी गेला असता ऑक्सिजन सिलेंडरची गळती होऊन त्याच्या अंगावर आल्याने तो जखमी झाला. त्यानंतर रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
या प्रकरणी या आधी आग्रीपाडा पोलिसांनी या घटनेशी संबंधित डॉ. सौरव लांजेकर, वॉर्डबॉय विठ्ठल चव्हाण, आणि महिला वॉर्ड अटेंडंट सुनीता सुर्वे यांना अटक केली होती, मात्र त्यांची शिवडी न्यायालयाने जामिनावर सुटका केली होती. त्यानंतर पोलीस तपासात रेडिओलॉजिस्ट डॉ. सिद्धांत शहा दोषी आढळल्याने पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. सध्या या प्रकरणातील सर्व आरोपीना जामीन मिळाला आहे.