मुंबई - एसटी कर्मचार्यांच्या संपाचा आज सहावा दिवस असून अद्यापही संपावर तोडगा निघालेला नाही. संपावर तोडगा निघावा यासाठी एसटी कर्मचाऱ्यांनी गुरूवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली होती. याच पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत लवकरात लवकर राज्य सरकारने तोडगा काढावा याबाबत चर्चा केली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया झाल्याने त्यांची भेट घेणं शक्य नव्हतं. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाच्या मुद्द्यावर शरद पवार यांची भेट घेऊन एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत लवकर तोडगा काढावा अशी विनंती राज ठाकरेंनी शरद पवारांना केल्याची माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली आहे.
कर्मचार्यांच्या संपाला मनसेकडून पाठिंबा आहे. सरकार कर्मचाऱ्यांच्या विरोधात जाणार नाही. लवकरात लवकर तोडगा निघेल असा विश्वासही बाळा नांदगावकर यांनी बोलून दाखवला. विलीनीकरणाचा निर्णय लगेच राज्य सरकारला घेता येत नसला तरी एसटी कर्मचाऱ्यांचा पगार वाढावा यासाठी सातव्या वेतन आयोगाप्रमाणे त्यांना पगार देण्यात यावा असा मार्ग राज ठाकरेंनी शरद पवार यांना सांगितले.