मुंबई - मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे आजपासून तीन दिवसीय कोलकाता दौऱ्यावर असणार आहेत. या दौऱ्यात, राज ठाकरे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री व तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी यांची 31 जुलै रोजी भेट घेणार आहेत. तर 1 ऑगस्टला राज ठाकरे मुंबईत परतील. ईव्हीएम विरोधातील आंदोलन तीव्र करण्यासाठी ही भेट होणार असल्याचे बोलले जात आहे.
लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर ईव्हीएम मशीनवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत सर्व विरोधकांनी टीका केली होती. काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी दिल्लीत निवडणूक आयोगाला भेट देत ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्याची मागणी केली. आता राज ठाकरे ममता बॅनर्जी यांची भेट घेऊन ईव्हीएम विरोधात वातावरण तापवणार असल्याचे बोलले जात आहे.