मुंबई -शिवसेनेने सेक्युलर पक्षांचा हात पकडल्यानंतर हिंदुत्वाची पोकळी भरून काढण्यासाठी राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आपल्या पक्षाचे रूपडे बदलले होते. आता राज ठाकरे 1 ते 9 मार्चदरम्यान अयोध्येला जाणार असल्याची माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली आहे. आगामी निवडणुकांच्या तयारीबाबत मनसे सक्रिय झाली आहे. आज मुंबईत राज्यव्यापी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला राज ठाकरे, अमित ठाकरे, अनिल शिदोरे आणि इतर प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती. यावेळी नांदगावकर यांनी पत्रकार परिषदेत घेत ही माहिती दिली.
आजच्या बैठकीला पक्षातील सर्व प्रमुख नेत्यांची उपस्थिती होती. लोकसभानिहाय मतदारसंघाचा आढावा घेऊन वरिष्ठ नेते राज ठाकरे यांना अहवाल देणार आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने पक्षाच्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने मेगा प्लॅन तयार केला आहे. या पार्श्वभूमीवर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्याचे आदेश देखील कार्यकर्त्यांना देण्यात येणार आहेत. अशी माहिती यावेळी बाळा नांदगावकर यांनी दिली.
२७ फेब्रुवारीला स्वाक्षरी मोहीम
२७ फेब्रुवारीला मराठी भाषा दिवस आहे, हा दिवशी उत्सव म्हणून साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी विविध ठिकाणी मराठी स्वाक्षरीची मोहीम घेण्यात येणार आहे. मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात काही ठिकाणी मनसे प्रमुख राज ठाकरे स्वत: या मोहीमेला उपस्थीत राहणार आहेत. यावेळी मराठी शिक्षकांचा सन्मान करण्यात येणार आहे. तसेच मराठी खेळाडू, साहित्यत, लेखक, कलावंत यांचा देखील यावेळी सन्मान करण्यात येणार असल्याचे नांदगावकर म्हणाले.