महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

जनआशीर्वाद यात्रा, मारामारी चालते; फक्त सणांमधूनच कोरोना पसरतो का? - राज ठाकरे - राज ठाकरेंची पत्रकार परिषद

मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी दहीहंडीच्या मुद्द्यावरून राज्य सरकारला लक्ष्य करत जोरदार टीका केली आहे. तुमची बाहेर पडायला फाटते, त्यात आमचा काय दोष? अशी खोचक टीका राज यांनी केली आहे. राज ठाकरेंनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत वेगवेगळ्या मुद्दयांवर भाष्य केले.

तुमची बाहेर पडायला फाटते, त्यात आमचा काय दोष? - राज ठाकरे
तुमची बाहेर पडायला फाटते, त्यात आमचा काय दोष? - राज ठाकरे

By

Published : Aug 31, 2021, 2:32 PM IST

Updated : Aug 31, 2021, 2:41 PM IST

मुंबई : मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी दहीहंडीच्या मुद्द्यावरून राज्य सरकारला लक्ष्य करत जोरदार टीका केली आहे. तुमची बाहेर पडायला फाटते, त्यात आमचा काय दोष? अशी खोचक टीका राज यांनी केली आहे. राज ठाकरेंनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत वेगवेगळ्या मुद्दयांवर भाष्य केले. दरम्यान, कोरोनामुळे सणासुदीच्या काळात गर्दीवर नियंत्रण आणण्याच्या सूचना केंद्र सरकारने दिल्या असल्या तरी दहीहंडी साजरी करण्याबाबत मनसेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. मनसेने मंगळवारी अनेक ठिकाणी पोलिसांचा विरोध झुगारून दहीहंडी साजरी केली आहे.

सर्वांना सारखेच नियम लावा
गेल्या वर्षीही दहीहंडी साजरी केली नाही. गेल्या वर्षीची परिस्थिती आणि या परिस्थितीत फरक आहे. दुष्काळ आवडे सर्वांना त्याप्रमाणे लॉकडाऊन आवडे सरकारला असे सध्या दिसत आहे. यात हजारो कोटींची कामे वाजवली जात आहे. मग पहिली, दुसरी तिसरी लाट येते. राज्य सरकारला नियम लावायचेच असतील तर मग ते सगळ्यांना एकसारखेच लावा. परंतु, सध्या सगळ्या राजकीय गोष्टी सुरळीत सुरु आहेत. नारायण राणे यांच्या घरासमोर हाणामारी सुरू, मेळावे सुरू, भास्कर जाधव यांच्या मुलासाठी मंदिरं उघडी करता; मग त्यांच्यासाठी नियम आणि देव वेगळा का? असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला. यामुळे सणांवरच बंधनं का? म्हणून मी सैनिकांना सांगितलं सुरू करा. जे होईल ते होईल, असं राज यावेळी म्हणाले.

मग स्टुलवर उभं राहून हंडी फोडायची का?
राज्य सरकारने दहीहंडीच्या सणावर निर्बंध लादले आहेत. जास्त थर रचू नका, असे सांगितले जाते. थर लावायचे नाहीत तर मग दहीहंडी स्टुलावर उभं राहून फोडायची का? या सगळ्याला काही अर्थ नाही. त्यामुळे मी माझ्या सर्व कार्यकर्त्यांना बाहेर पडून सण साजरे करण्यास सांगितल्याचे राज यांनी म्हटले.

जनाआशीर्वाद यात्रा चालते
यांनी वाट्टेल त्या गोष्टी करायच्या, आम्ही दहीहंडी नाही करायची. क्रिकेट, फुटबॉल सगळं सुरू आहे. जुन्या महापौर बंगल्यावर बिल्डरांच्या गाड्या कमी झालेल्या दिसत नाही. काहीच बंद नाही, मग सणांवर बंदी का? असा सवाल राज यांनी उपस्थित केला. महाराष्ट्रात, मुंबईतच का? बाकीच्या राज्यात का नाही? जनाआशीर्वाद यात्रा चालते. सण आला की लॉकडाऊन लावला जातो असे राज यावेळी म्हणाले.

आम्ही केसेस मोजत नाही

जसं अस्वलाच्या अंगावर किती केस असतात ते अस्वल मोजत नाही. तसंच आमच्या अंगावर किती केसेस आहेत हे आम्ही मोजत नाही असे राज ठाकरे म्हणाले.

मंदिरं उघडली पाहिजे
मंदिरं सुरू नाही केली तर मंदिरं उघडण्यासाठी मनसेतर्फे घंटानाद आंदोलनं करण्यात येतील. सगळ्यांना नियम सारखे लावा, एकाला एक दुसऱ्याला दुसरा असं नाही चालणार असं राज म्हणाले.

आमच्याकडून मार खाईल
ठाण्यात परप्रांतीय फेरीवाल्याने महिला अधिकाऱ्यावर हल्ला केला. पोलिसांकडून ज्या दिवशी तो सुटेल, त्या दिवशी आमच्याकडून मार खाईल. यांची मस्ती उतरवली पाहिजे. यांची सर्व बोटं छाटली जातील. फेरीवाला म्हणून फिरता येणार नाही तेव्हा यांना कळेल. यांची हिम्मत कशी होते? निषेधाने हे सुधारणारे नाहीत. तुम्ही बोटं छाटता? आज पकडलेत, उद्या बेल होईल, पुन्हा हे बोटं छाटायला बाहेर. सरकार कशासाठी आहे? सरकारने यावर बंधनं आणली पाहिजे असे राज म्हणाले.

हेही वाचा -होय, मीच कार्यकर्त्यांना दहिहंडी साजरी करण्यास सांगितले -राज ठाकरे

Last Updated : Aug 31, 2021, 2:41 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details