मुंबई :राज्यभरात झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली. शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. पावसामुळे विविध ठिकाणी तब्बल 48 जणांनी जीव गमावला आहे. पावसादरम्यान पुणे विभागातील 29 जणांचा मृत्यु झाला आहे. कोकण विभागातील 3 तर मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये 16 जणांचा मृत्यू झाला. कर्नाटकातील उत्तर भागातील जिल्ह्यातही पावसाने थैमान घातलंय. काही भागात तर एका महिन्यात तीन वेळा पूरस्थितीचा सामना करावा लागला आहे.
पंतप्रधानांचा आढावा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबतही फोनवर चर्चा केली. महाराष्ट्रातील अनेक भागांत अतिवृष्टीमुळे पूरस्थिती निर्माण झाली. या परिस्थितीचा आढावा आणि माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्र्यांकडून घेतली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवश्यक ती मदत पुरवण्याचं आश्वासनही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलं आहे.
कोकण, गोवा आणि ओडिसा आणि आंध्र प्रदेश किनारपट्टीवर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस व पुरामुळे 3,000 पेक्षा जास्त घरांचं नुकसान झालं असून 40,000 हून अधिक लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे.