मुंबई -लोकल मध्ये गर्दी होऊ नये म्हणून गर्दीच्यावेळी सर्वसामान्य प्रवाशांना प्रवास करण्यास मनाई केली आहे. मात्र फेरीवाल्यांकडून सर्रासपणे कोणत्याही वेळी विक्री केली जाते. एकीकडे सर्व सामान्य मुंबईकरांना वेळेची मर्यादा घालत लोकल ट्रेनमधून प्रवास करण्याची मुभा दिली आहे. तर दुसरीकडे अनधिकृत फेरीवाले बिनधास्त लोकल डब्यात शिरकाव करत आहेत. यासंबंधी अनेक तक्रारी करून सुद्धा या फेरीवाल्यांवर कारवाई होत नाही. रेल्वे प्रशासन अनधिकृत फेरीवाल्यांवर मेहरबान आहे का? असा प्रश्न सर्वसामान्य प्रवाशांना पडला आहे.
फेरीवाल्यांना नियम नाही का?
कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाकडून खबरदारीची पावले उचलण्यात आली आहे. लोकल आणि इतर प्रवासात गर्दी होऊ नये, सर्वसामान्य प्रवाशांना आणि शासकीय कर्मचाऱ्यांसाठी लोकलच्या वेळात बदल करण्यात आले आहे. त्यामुळे नियमाची खात्री सर्वसामान्य मुंबईकरांवर रेल्वेकडून लावली जात आहे. मात्र लोकल प्रवासात आणि रेल्वे परिसरा फेरीवाल्यांवर कसला ही नियम लादला जात नाही आहे. कोरोना सारख्या महामारीत अनधिकृत फेरीवाल्यांना रेल्वेचा आशीर्वाद असल्याने कोणतीही भीती न बाळगता विक्री करत आहेत, अशी प्रतिक्रिया प्रवासी संघटनेकडून देण्यात आली.
महिला डब्यात पुरुष फेरीवाले-
महिलांच्या डब्यात पुरूष फेरीवाले बिनधास्तपणे चढून विक्री करतात. अचानकपणे तीन ते चार पुरूष विक्रेते महिला डब्यात शिरतात. विक्रेते कोणत्याही डब्यात शिरून विक्री करतात. रेल्वे प्रशासन कोणती अनुचित घटना घडल्यावर लक्ष देणार आहे. मास्क न घालणाऱ्यावर, व्यवस्थित न घालणाऱ्या सर्वसामान्य प्रवाशांवर कारवाई होते. मात्र, काही विक्रेते व्यवस्थित मास्क न घालता विक्री करत आहेत. यावर रेल्वे प्रशासन, रेल्वे सुरक्षा व्यवस्था कारवाई करण्यास कुचराई का करत आहे असा प्रश्न सामन्य प्रवाशांकडून रेल्वेला विचारला जात आहे.
फेरीवाल्यांचा सुळसुळाट-
पादचारी पुलावर गर्दी होऊ नये, प्रवाशांना एका फलाटावरून दुसऱ्या फलाटावर व्यवस्थित जात यावे, फलाटावरून स्थानकाबाहेर पडत यावे, यासाठी पादचारी पुलावर कोणत्याही फेरीवाल्याला बसण्यास मनाई आहे. तसेच प्रभादेवी स्थानकावरील दुर्घटनेनंतर पादचारी पुलावर फेरीवाल्यांना बसण्यास मज्जाव केला आहे. उच्च न्यायालयाने रेल्वे स्थानकाच्या बाहेर, पादचारी पुलाच्या 150 मीटर अंतरापर्यंत फेरीवाल्यांना बसण्यास, व्यवसाय करण्यास निर्बध लादले आहेत. मात्र रेल्वेच्या हद्दीतील भागात आणि नवीन पादचारी बनवलेल्या ठिकाणी फेरीवाल्यांचा सुळसुळाट पसरलेला आहे. पर्स, बॅग, भाजीपाला, फळे, प्लस्टिकच्या टोपल्या, सौंदर्य प्रसाधनाच्या वस्तू अशा वस्तू विक्रीस ठेवल्या आहेत.