महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

'त्या' कार्यक्रमात सामील झालेल्या सेलिब्रिटींची केंद्रीय चौकशी करा; खासदार राहुल शेवाळेंची मागणी - भारतविरोधी बॉलिवूड अभिनेते

ह्युस्टन, अमेरिका येथून प्राप्त झालेल्या तक्रारी आणि कागदपत्रांच्या आधारे शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी सुमारे 3 वर्षांपूर्वी तत्कालीन परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे तक्रार केली होती. अमेरिकेत बॉलिवूड इव्हेंट आयोजित करणारा पाकिस्तानी रेहान सिद्दीकी हा भारतविरोधी कारवायांसाठी आयएसआय या दहशतवादी संघटनेला आर्थिक मदत करत असल्याची माहिती या तक्रारीत देण्यात आली होती.

रेहान सिद्दीकी
रेहान सिद्दीकी

By

Published : Jul 23, 2020, 6:17 PM IST

मुंबई - अमेरिकेत बॉलिवूड इव्हेंट आयोजित करून आयएसआयला पैसे पुरवणाऱ्या रेहान सिद्दीकी आणि त्याच्या साथीदारांवर केंद्रीय गृह मंत्रालयाने बंदी घातली आहे. बॉलिवूड इव्हेंटच्या नावाखाली भारतविरोधी कारवाई करणाऱ्या या टोळीच्या विरोधात गेल्या तीन वर्षांपासून आवाज उठवणाऱ्या शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांना पत्र पाठवून केंद्रीय गृह मंत्रालयाने या कारवाईची माहिती दिली आहे. आयएसआयला आर्थिक मदत करणाऱ्या रेहान सिद्दीकीच्या कार्यक्रमांमध्ये हजेरी लावणाऱ्या बड्या बॉलिवूड कलाकारांची ईडी (सक्तवसुली संचालनालय) आणि एनआयए (राष्ट्रीय तपास यंत्रणा) च्या माध्यमातून चौकशी व्हावी, अशी मागणी खासदार राहुल शेवाळे यांनी लावून धरली आहे.

खासदार राहुल शेवाळेंची मागणी
ह्युस्टन, अमेरिका येथून प्राप्त झालेल्या तक्रारी आणि कागदपत्रांच्या आधारे शिवसेना खासदार राहुल शेवाळे यांनी सुमारे 3 वर्षांपूर्वी तत्कालीन परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्याकडे तक्रार केली होती. अमेरिकेत बॉलिवूड इव्हेंट आयोजित करणारा पाकिस्तानी रेहान सिद्दीकी हा भारतविरोधी कारवायांसाठी आयएसआय या दहशतवादी संघटनेला आर्थिक मदत करत असल्याची माहिती या तक्रारीत देण्यात आली होती.

तसेच सिद्दीकीच्या रेडिओ चॅनल, सोशल मीडियाद्वारे होणारा भारतविरोधी प्रचार याचीही माहिती देण्यात आली. रेहान सिद्दीकीसह राकेश कौशल आणि दर्शन मेहता यांच्यावर बंदी घालून या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी खासदार शेवाळे यांनी केली होती. यासंदर्भात केंद्रीय मंत्री जनरल व्ही. के. सिंग यांची भेट घेतल्यावर ह्युस्टन येथील हायकमिशनला या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश देण्यात आले.

दरम्यान, फेब्रुवारी 2020 मध्ये खासदार शेवाळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय मंत्री अमित शाह यांना याप्रकरणी पत्र लिहून कारवाईची मागणी केली. या पत्राची दखल घेऊन केंद्र सरकारने, ह्युस्टन येथील काँस्युलेट जनरल ऑफ इंडिया यांना चौकशीचे आदेश दिले. या चौकशीनंतर, रेहान सिद्दीकी आणि त्याच्या साथीदारांचा भारत विरोधी कृत्यांमध्ये सहभाग असल्याचे स्पष्ट झाले. यासंदर्भातील अहवाल पंतप्रधान कार्यालय आणि गृहमंत्रालायला सोपविण्यात आला. अखेर केंद्रीय गृह मंत्रालयाने सिद्दीकी आणि त्याच्या साथीदारांवर बंदी घालण्याचे आदेश जारी केले. तसेच, वॉशिंग्टनमधील भारतीय दुतावासाने भारतीय कलाकारांना, रेहान सिद्दीकी, राकेश कौशल आणि दर्शन मेहता यांच्या कार्यक्रमांमध्ये सामील न होण्याच्या सूचना दिल्या आहेत. याविषयीची माहिती केंद्रीय गृह राज्यमंत्री जी. किशन रेड्डी यांनी पत्राद्वारे खासदार राहुल शेवाळे यांना 28 जून 2020 रोजी कळविली.

पाकिस्तानच्या पंतप्रधानांसह रेहान सिद्दीकी
माझ्या तक्रारीची दखल घेत केंद्र सरकारने केलेल्या कारवाईबाबत मी गृहमंत्री अमित शाह आणि केंद्र सरकारचा आभारी आहे. गेल्या 3 वर्षांत ज्या ज्या बॉलिवूड कलाकारांनी रेहान सिद्दीकी आणि त्याच्याशी संबंधित परदेशातील कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला असेल त्यांची सक्तवसुली संचालनालय आणि राष्ट्रीय तपास यंत्रणा मार्फत कसून चौकशी व्हायला हवी. यामुळे देशहित हे आपल्यासाठी सर्वोच्च प्राथमिकता आहे, हा संदेश पोहोचू शकेल, असे खासदार राहुल शेवाळे यांनी सांगितले.

हेही वाचा -कारगिल युद्ध: टेलिफोन रेकॉर्डिंगमुळे पाकिस्तानचा खोटेपणा जगासमोर उघड

ABOUT THE AUTHOR

...view details