मुंबई - अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) कडक कारवाई केल्यानंतर, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी बुधवारी राहुल गांधींचे पत्र शेअर केले आहे. या पत्रात काँग्रेसने राऊत यांना पाठिंबा दिला आहे. 15 फेब्रुवारीच्या पत्रात, राहुल गांधींनी राऊत आणि त्यांच्या सहकाऱ्यांना त्रास आणि धमकावल्याबद्दल केंद्रीय तपास संस्थांचा निषेध केला आहे.
पत्रात लिहिताना राहुल गांधी यांनी म्हटले आहे की, संजय राऊत, मला आशा आहे की तुम्हाला माझे पत्र मिळाले असेल. माझे हे पत्र तुम्ही राज्यसभेचे अध्यक्ष व्यंकय्या नायडू यांना ८ फेब्रुवारीला लिहिलेल्या पत्राच्या समर्थनार्थ आहे. केंद्रीय तपास यंत्रणा ज्या प्रकारे तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला लक्ष्य करत आहेत. त्याचा मी निषेध करतो. पत्रात तुम्ही तपास यंत्रणांनी ज्या प्रकारे छळवणूक आणि धमकावल्याची उदाहरणे दिली आहेत. त्यातून मोदी सरकारचा पर्दाफाश होत आहे. तपास यंत्रणांचा सततचा गैरवापर लोकशाहीसाठी घातक आहे. या सरकारला विरोधकांना गप्प करायचे आहे. काँग्रेस पक्ष सदैव तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, याची मी खात्री देतो, असेही म्हणाले आहे.