मुंबई - प्रशासकीय अधिकारी राधेश्याम मोपलवार हे मागील दोन वर्षांपासून महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळा (एमएसआरडीसी)च्या उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक पदावर करार पद्धतीने कार्यरत आहेत. त्यांची मुदतवाढ 31 मे रोजी संपली असून त्यांना आता राज्य सरकारने पुन्हा सहा महिन्यांची मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार मोपलवार 30 नोव्हेंबर पर्यंत करार पद्धतीने उपाध्यक्ष-व्यवस्थापकीय संचालकपदी कार्यरत असणार आहेत.
2018पासून करार पद्धतीने कार्यरत -
मोपलवार हे एमएसआरडीसीच्या व्यवस्थापकीय संचालक-उपाध्यक्षपदी अनेक वर्षे काम करत आहेत. त्यांच्या कार्यकालात समृद्धी महामार्गासह अनेक महत्त्वाचे प्रकल्प मार्गी लागले असून हे प्रकल्प आजही सुरू आहेत. समृद्धी महामार्ग हा राज्य सरकारचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असून या प्रकल्पाला सुरुवातीला जोरदार विरोध झाला. मात्र, तरीही हा प्रकल्प मोपलवार यांनी पुढे नेला. हीच बाब लक्षात घेत फेब्रुवारी 2018मध्ये ते सेवा निवृत्त झाल्यानंतर त्यांची एक वर्षासाठी करार पद्धतीने एमएसआरडीसीच्या व्यवस्थापकीय संचालक-उपाध्यक्ष पदी राज्य सरकारने नियुक्ती केली. हा कालावधी 28 फेब्रुवारी 2019ला संपला. मात्र, त्यावेळी सरकारने त्यांना एक वर्षांची मुदतवाढ दिली. ही मुदतवाढ 28 फेब्रुवारी 2020ला संपली आणि त्यांना पुन्हा सरकारने एक वर्षाची मुदतवाढ लागू केली. त्यानंतर तीन महिन्यांची तर आता आज पुन्हा त्यांना सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. यासंबंधीचे पत्र जारी करण्यात आले आहे. त्यानुसार आता ते 30 नोव्हेंबर 2021पर्यंत करार पद्धतीने सध्याच्या पदावर कार्यरत राहणार आहेत. या पत्रानुसार समृद्धी महामार्गाचे काम अंतिम टप्प्यात असल्याने मोपलवार यांना सहा महिने मुदतवाढ देण्यात आल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
सेवानिवृत्त अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचा वाद -
प्रशासकीय अधिकाऱ्यांची करार पद्धतीने होणारी नियुक्ती आणि त्या नंतर त्यांना मिळणारी मुदतवाढ हा सध्या टीकेचा, नाराजीचा आणि वादाचा विषय बनला आहे. हा वाद लक्षात घेता गुरूवारी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणा(एमएमआरडीए)च्या महानगर आयुक्त पदी करार पद्धतीने नियुक्त असलेल्या आर ए राजीव यांना मुदतवाढ नाकारण्यात आली. त्यांच्या जागी एस. व्ही. आर. श्रीनिवास यांची नियुक्ती करण्यात आली आहे. असे असताना दुसरीकडे मात्र आज मोपलवार यांना सहा महिने मुदतवाढ दिली आहे. त्यांना लागोपाठ तिसऱ्यांदामुदतवाढ देण्यात आली आहे.