मुंबई -टाळेबंदीमध्ये शिथिलता दिल्यावर आणि लोकल रेल्वे सुरू होताच मुंबईत कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढू लागले आहेत. कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागताच पालिका सक्रिय झाली आहे. पवई येथील एव्हरेस्ट हाईट्स या इमारतीमध्ये एक नागरिक कोरोनाग्रस्त असल्याचे आढळून आला. मात्र, या इमारतीमधील रहिवाशांकडून क्वारंटाईन नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी महिलेच्या विरोधात पालिकेने पवई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
पालिका प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार, पवई, चांदीवली येथील एव्हरेस्ट हाईट्स या इमारतीमधील फ्लॅट क्रमांक १७०१/१७०२ मध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे एसआरएल डायग्नोस्टिक लॅबच्या वैद्यकीय अहवालानुसार समोर आले. त्यामुळे पालिकेच्या आरोग्य यंत्रणेने या सोसायटीमधील रुग्ण आढळून आलेल्या १७ व्या मजल्याला सील केले. तसेच, या मजल्यावरील रहिवाशांनी इमारतीबाहेर ये - जा करू नये, अशी सक्त ताकीद देण्यात आली होती. त्याचप्रमाणे या सोसायटीच्या बाहेर पालिकेने यासंदर्भांतील माहितीपर फलकही लावला आहे. मात्र, तरीही याच मजल्यावर फ्लॅट क्रमांक १७०३/१७०४ यामध्ये राहणाऱ्या कामिया वर्मा या १७ व १८ फेब्रुवारी रोजी दोन दिवस फ्लॅटबाहेर म्हणजे इमारतीच्या बाहेर गेल्याचे पालिकेचे सहाय्यक वैद्यकीय अधिकारी डॉ. हिरामण महांगडे यांना आढळून आले. तसेच, या महिलेच्या घरातील मोलकरीण त्यांच्या पाळीव कुत्र्याला घेऊन इमारतीबाहेर ये - जा करीत असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे डॉ. महांगाडे यांनी वरिष्ठांच्या आदेशाने गंभीर दखल घेऊन पवई पोलीस ठाण्यात सदर महिलेच्या विरोधात एफआयआर दाखल केला आहे.
हेही वाचा-CORONA: मुंबईकरांनो हे नियम पाळा, अन्यथा होणार कडक कारवाई
धारावीत झाली होती पहिली कारवाई -
कोरोना रुग्ण आढळून आल्यावर पालिकेचा आरोग्य विभाग त्याच्या संपर्कातील व्यक्तींना क्वारंटाईन करतो. क्वारंटाईन दरम्यान त्या व्यक्तीला घराबाहेर जाण्यास आणि इतर लोकांमध्ये मिसळण्याची परवानगी नसते. मुंबईत आणि धारावीत मोठ्या प्रमाणात कोरोनाचा प्रसार झाला असताना क्वारंटाईन नियम मोडल्याचा प्रकार उघडकीस आला होता. त्यावेळी एका व्यक्तीच्या विरोधात धारावी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला होता.
हेही वाचा-कोरोना रुग्णवाढ : 'या' जिल्ह्यांमध्ये प्रतिबंधित क्षेत्रे जाहीर करण्याच्या सूचना
होम क्वारंटाईनचा नियम मोडल्यास होणार गुन्हा दाखल-
होम क्वारंटाईन राहणाऱ्यांकडून अनेकवेळा नियमांचे उल्लंघन केले जात असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे अशा क्वांरटाईन होणाऱ्यांच्या हातावर शिक्के मारले जाणार आहेत. त्यांच्यावर पालिकेची नजर असणार आहे. नियम धाब्यावर बसवल्यास गुन्हा दाखल करण्याचे आदेश पालिका आयुक्तांनी दिले आहेत.
होम क्वारंटाईन व्यक्तीच्या हातावल शिक्के मारणार -
लक्षणे आढळत नसलेल्या बाधित (असिम्प्टोमॅटिक) रुग्णांना होम क्वारंटाईन करण्यात येते. त्यासाठी पालिकेने सूचना दिल्या आहेत. लक्षणे आढळत नसलेल्या बाधित रुग्णांवर पूर्वीप्रमाणे हातावर शिक्के मारण्यात यावेत. तसेच त्यांची माहिती संबंधित सोसायटींना कळवावी. वॉर्ड वॉर रुम्सच्या माध्यमातून त्यांच्यावर बारकाईने नजर ठेवावी. अशा व्यक्तींना दिवसातून ५ ते ६ वेळा दूरध्वनीवर संपर्क साधून ते घरी असल्याची खातरजमा करावी. बाधित व्यक्तींची योग्य माहिती ठेवून त्यांच्या नजीकच्या संपर्कातील व्यक्तींनाही क्वारंटाईन करावे. तसेच कालावधी पूर्ण होण्याआधी रुग्ण घराबाहेर पडला. सार्वजनिक ठिकाणी फिरला तर त्याची माहिती सोसायट्यांनी महानगरपालिकेच्या वॉर्ड वॉर रुमला कळवावी. वॉर्ड वॉर रुमने अशा रुग्णांवर गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही करावी. तसेच अशा रुग्णांना सक्तीने संस्थात्मक विलगीकरण (इन्स्टिट्यूशनल क्वारंटाईन) करावे, अशा सूचना आयुक्तांनी दिल्या आहेत.