मुंबई - कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या धारावीत कोरोनाच्या रुग्णांना विलगीकरणात ठेवता यावे म्हणून ३,७४० खाटांचे 'कोरोना केअर सेंटर' उभारले जात आहे. यासोबतच, माहीम निसर्गोपचार केंद्राच्या जागेवरही २०० खाटांचे विलगीकरण कक्ष उभारले जात आहे. यामुळे धारावीत एकूण ४,४०७ खाटांची क्षमता असलेले विलगीकरण कक्ष उपलब्ध होणार आहे. पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजीव जयस्वाल यांनी आज या कामाची पाहणी केली.
मुंबईत हॉटस्पॉट असलेल्या धारावीत कोरोनाचे १,५४१ रुग्ण आहेत. धारावीत कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने, रुग्णांवर उपचार करता यावेत म्हणून कोरोना केअर सेंटर २ (सीसीसी-२) अंतर्गत ६६७ खाटा उपलब्ध करण्यात आल्या आहेत. या विभागामध्ये 'कोरोना केअर सेंटर १' (सीसीसी-१) अंतर्गत ३ हजार ७४० खाटांच्या क्षमतेची व्यवस्था करण्यात येत आहे. यामध्ये माहिम निसर्गोद्यान समोरील ३५ हजार चौरस फूट क्षेत्रफळाच्या भूखंडावर २०० खाटांच्या जम्बो फॅसिलीटीचाही समावेश आहे. या जम्बो फॅसिलीटीमध्ये प्रत्येक खाटेवर ऑक्सिजन पुरवठ्याची (व्हेंटिलेटर) सोय असेल. सीसीसी-१ आणि सीसीसी-२ मिळून एकूण ४ हजार ४०७ खाटा क्वारेंटाईनसाठी उपलब्ध होणार आहेत. यामुळे धारावीमधील जास्तीत जास्त नागरिकांना विलगीकरणात ठेवता येणे शक्य होणार आहे.