महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मंत्रालय उडवून देण्याच्या धमकीचा मेल, अवघ्या तासाभरात गुन्हेगाराला येथून केली अटक - मंत्रालयाला धमकीचा मेल

मुलाला अॅडमिशन मिळत नसल्याच्या रागातून, मंत्रालय उडवून देण्याची धमकी देणाऱ्या गुन्हेगाराला पुणे पोलिसांनी अवघ्या तासाभरात अटक केली आहे. सोमवारी सायंकाळी ६ वाजल्याच्या सुमारास मंत्रालय सुरक्षा विभागाला हा धमकीचा मेल आला होता.

मंत्रालय
मंत्रालय

By

Published : Jun 22, 2021, 6:50 AM IST

Updated : Jun 22, 2021, 1:25 PM IST

मुंबई- राज्याचा जेथून गाडा हाकला जातो, ते मंत्रालय बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा निनावी ई-मेलने खळबळ उडाली होती. मात्र, अवघ्या तासाभरात निनावी मेल पाठवणाऱ्या शैलेश शिंदे याला पुणे पोलिसांनी अटक केली आहे. मुलाला अॅडमिशन मिळत नसल्याच्या रागातून मेल पाठवल्याचे त्याने कबूल केले. दरम्यान, सायबर ऍक्टनुसार त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती, मरिन ड्राइव्ह पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वनाथ कोळेकर यांनी दिली.

पुण्यातून आला ई-मेल

सोमवारी सायंकाळी ६ वाजल्याच्या सुमारास मंत्रालय सुरक्षा विभागाला हा धमकीचा मेल आला होता. मंत्रालयात अज्ञात व्यक्तीकडून बॉम्ब ठेवल्याचा धमकीच्या या ई-मेलमुळे मंत्रालयात खळबळ उडाली. मंत्रालय परिसरातील सुरक्षा अधिक वाढवण्यात आली. बॉम्ब नाशक आणि शोधक पथकानेही मंत्रालय परिसराचा कसून तपास केला. मात्र हा मेल फसवा असल्याचे उघड झाल्याने, मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी त्यानंतर केलेल्या तपासणीत पुण्यातून ई-मेल आल्याचे उघड झाले.

मुलाला शाळेत अॅडमिशन न मिळाल्याने पाठवला मेल

पुण्यातून शैलेश शिंदे नावाच्या व्यक्तीने ई-मेल पाठवला होता. मुंढवा पोलिसांनी त्याला ताब्यात घेतला असून, मुलाला शाळेत अॅडमिशन मिळाले नसल्याने त्याने गृहविभागाला धमकीचा मेल पाठवल्याचे शिंदे याने पोलिसांना सांगितले. अशी माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक कोळेकर यांनी दिली. शिंदेला मरीन ड्राइव्ह पोलिसांच्या ताब्यात सोपवण्यासाठी पुणे पोलिसांचे एक पथक रात्री 9 वाजण्याच्या सुमारास पुण्यातून रवाना झाल्याचेही ते म्हणाले. दरम्यान मंत्रालयात बॉम्ब ठेवला असल्याची धमकी देणारी पंधरा दिवसातली ही दुसरी घटना आहे.

यापूर्वीही धमकीचे मेल

मंत्रालयात यापूर्वी ३० मे रोजी बॉम्ब ठेवल्याचा फेक मेल आला होती. या मेलमुळे काही वेळ मंत्रालय परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. एका अज्ञात व्यक्तीने मंत्रालयात फोन करुन बॉम्ब ठेवल्याचे सांगितले होते. मात्र तपासाअंती हा फोन बनावट आणि अफवा असल्याचे समोर आले. याप्रकरणी नागपूरमधील सागर मंदेरे या मनोरुग्ण तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले होते.

हेही वाचा -बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसलेंची ४० कोटींची मालमत्ता जप्त; ईडीची कारवाई

Last Updated : Jun 22, 2021, 1:25 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details