मुंबई- कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीला महिना उलटला आहे. या महिनाभरात अनेकजण बेरोजगार असल्याने त्यांची उपासमार होत आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील लाखो रिक्षा आणि टॅक्सी चालकांना महिना पाच हजार रुपये बेरोजगार भत्ता द्यावा अशी मागणी काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे केली आहे.
दिल्ली सरकारने रिक्षा व टॅक्सी चालकांनादेखील महिना पाच हजार रुपयांचा बेरोजगार भत्ता घोषित केला आहे. महाराष्ट्रात १० लाख ६० हजार रिक्षाचालक तसेच २ लाख ७५ हजार टॅक्सीचालक परवानाधारक आहेत.
राज्य सरकारने नोंदणीकृत बांधकाम मजुरांना २ हजार रुपये मदतीची घोषणा केली आहे. त्यानुसारच मोटार वाहन विभागाकडून माहिती घेवून परवानाधारक रिक्षा-टॅक्सी चालकांना मदत करावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.