मुंबई -नागरिकत्व संशोधन कायदा (CAA) आणि राष्ट्रीय नागरिक रजिस्टर (NRC) ला देशात काही ठिकाणी विरोध तर काही ठिकाणी समर्थन मिळताना दिसत आहे. महाराष्ट्रातही या कायद्याचा परिणाम पाहायला मिळत आहे. राज्यातील अनेक शहरात मागील काही दिवसांपासून या कायद्याच्या विरोधात तर काही ठिकाणी समर्थनार्थ मोर्चे काढण्यात आले. मुंबई, सांगोला, पालघर, उस्मनाबाद, हिंगोली, नांदेड, अर्धापूर, अकोला, चंद्रपूर, यवतमाळ, रायगड, ठाणे, पुणे, जळगाव, नाशिक, पिंपरी-चिंचवड, येवला आदी ठिकाणी मोर्चे काढण्यात आले.
हेही वाचा...एनआरसीबाबत पंतप्रधान मोदी देशाशी खोटं बोलले; त्यांचा निषेध करावा तेवढा कमीच
सांगोला येथे नागरिकत्व दुरुस्ती कायदा व एनआरसी विरोधात मोर्चा
सांगोला येथे नागरिकत्व दुरुस्ती कायदा व एनआरसीला विरोध करण्यासाठी मोर्चाचे आयोजन करण्यात आले. सांगोल्यातील कडलास नाका येथून या भव्य मोर्चाची सुरुवात करण्यात आली. मोर्चामध्ये सहभागी असणाऱ्या अनेकांच्या हातात यावेळी काळे झेंडे होते, तर काहीजण तिरंगा झेंडा हातात घेवून घोषणा देत मोर्चात सहभागी झाले होते.
मुंबई आयआयटीत सुधारित नागरिकत्व कायद्याच्या समर्थनात रॅली
देशात सुधारित नागरिकत्व कायद्याला विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्षांनी विरोध केला. त्यामुळे देशभर या कायद्याच्या विरोधात वातावरण उभे राहिलेले दिसत असतानात, मुंबईतील आयआयटीच्या विद्यार्थ्यांनी या कायद्याच्या समर्थनार्थ कॅम्पसमध्ये समर्थन रॅली काढली.
पालघरमध्ये नागरिकत्व कायद्याविरोधात मोर्चा
केंद्र सरकारच्या नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए) आणि राष्ट्रीय नागरिकता नोंदणी (एनआरसी) कायद्याविरोधात पालघरमध्ये बहुजन समाजाकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढण्यात आला. पालघर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक ते पालघर जिल्हाधिकारी कार्यालय, असे या मुक मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.
नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या समर्थनार्थ उस्मानाबादमध्ये मोर्चा
नागरिकत्व सुधारणा कायद्याला समर्थन देत, जनजागृती करण्यासाठी उस्मानाबाद शहरात मोर्चा काढण्यात आला. अनेक संघटनांनी या कायद्याचा विरोधात धरणे आंदोलन केले. मात्र, पालघरमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टी, विश्व हिंदू परिषद, राष्ट्रसेविका समिती, किसान संघ, मजदूर संघ, भटके-विमुक्त विकास परिषद, शिवराज्याभिषेक सोहळा समिती, भारत माता मंदिर प्रकल्प यांच्यासह 45 सामाजिक संस्था संघटनांनी एकत्र येऊन रॅली काढली होती.
हेही वाचा... भाजप छी छी..! ममतांनी दिल्या भाजपसह सीएए, एनआरसी विरोधात घोषणा
हिंगोली येथे नागरिकत्व कायद्याच्या समर्थनार्थ जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नागरिकत्व कायद्याच्या विरोधात मोर्चा निघाला. मात्र, हिंगोलीत पहिल्यांदाच नागरिकत्व कायद्याच्या समर्थनात मोर्चा काढण्यात आला. विशेष म्हणजे या मोर्चामध्ये 151 फूट तिरंगा झेंड्याची रॅली काढण्यात आली. बहुसंख्य नागरिकांनी रस्त्यावर येत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला.
अर्धापूरमध्ये नागरिकता संशोधन विधेयकाच्या समर्थनार्थ भव्य मोर्चा
केंद्र सरकारने नागरिकता संशोधन विधेयक पारीत केल्यावर काही राज्यात या कायद्याला विरोध करत मोर्चे काढण्यात आले. मात्र, हे विधेयक भारतीय नागरिकांच्या विरोधात नसून परदेशातून आलेल्या घूसखोरांना प्रतिबंध घालण्यासाठी असल्याचे सांगत, या विधेयकाच्या समर्थनार्थ नांदेडमधील अर्धापूर येथे सोमवार 23 डिसेंबर रोजी भव्य मोर्चा काढण्यात आला.
अकोल्यात महासभेद्वारे एनआरसीला विरोध
अकोल्यात एका विशाल सभेद्वारे NRC आणि CAA कायद्याला विरोध दर्शवण्यात आला आहे. अकोला क्रिकेट क्लब येथे तहफुज-ए-कानून-ए-शरियत समितीतर्फे या सभेचे आयोजन करण्यात आले होते.
नागरिकता कायद्याविरोधात मुस्लीम समाजाचा निषेध मोर्चा
चंद्रपूरमधील गडचांदूर येथे नागरिकता कायद्याच्या विरोधात मुस्लीम समाजाने निषेध मोर्चा काढला. केंद्र शासने मंजूर केलेले नागरिक संशोधन विधेयक रद्द करण्यात यावे, या मागणीसाठी गडचांदूर येथील मुस्लीम समाजाच्या वतीने या निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले.
हेही वाचा...'शिवभोजन' थाळीचं ठरलं; १० रुपयात मिळणार 'हे' पदार्थ
नागरिकत्व दुरुस्ती कायदा लवकरात लवकर लागू करा ABVP मागणी
उस्मानाबाद जिल्ह्यात नागरिकत्व दुरूस्ती कायदा महाराष्ट्रात लवकरात लवकर लागू करण्यात यावा, यासाठी एबीव्हीपीकडून जोरदार निदर्शने करण्यात आली. अनेक राज्यांकडून या कायद्याची अंमलबजावणी करण्यास नकार दर्शवण्यात आला आहे. मात्र, महाराष्ट्रात हा कायदा लवकरात लवकर लागू करावा, अशी मागणी ABVP संघटनेच्या वतीने करण्यात आली.
सीएबी व एनआरसी विरोधात उमरखेडमध्ये धरणे आंदोलन
यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड येथे, केंद्र शासनाने पारित केलेल्या नागरिकता दुरूस्ती कायद्याच्या विरोधात विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटनाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. उपविभागीय कार्यालय प्रांगणात हे आंदोलन करण्यात आले.