मुंबई -नागरिकत्व संशोधन कायदा आणि राष्ट्रीय नागरिक रजिस्टर (एनआरसी) च्या विरोधात देशभरात तीव्र विरोध होत आहे. मात्र, काही ठिकाणी या कायद्याला समर्थन देखील असल्याचे पाहायला मिळत आहे. महाराष्ट्रातही या कायद्याचा परिणाम पाहायला मिळत आहे. राज्यात काही ठिकाणी कायद्याच्या विरोधात तर काही ठिकाणी समर्थनार्थ मोर्चे निघाले. शेगाव, लातूर, भिवंडी, जालना, भोकरदन, नांदेड, कल्याण, अर्धापूर, इस्लामपूर, नाशिक याठिकाणी मोर्चे काढण्यात आले.
हेही वाचा... #CAA : स्थलांतरितांसाठी नरेंद्र मोदी हे 'देवा'प्रमाणे, शिवराज सिंह चौहान बरळले
नागरिकता सुधारणा कायद्याला शेगावात कडाडून विरोध
भारतीय संविधानाचा मूळ गाभा असलेल्या एकात्मतेला डावलून बहुमताच्या आणि सत्तेच्या जोरावर भाजप सरकारने नागरिकता सुधारणा विधेयक लोकसभेत आणि राज्यसभेत मंजूर केले, असा आरोप करत बुलडाणा जिल्ह्यातील शेगावात अनेक राजकीय पक्षांसह विविध संघटनांच्या वतीने भव्य अशा मूकमोर्चाचे आयोजन सोमवारी करण्यात आले होते. राष्ट्रपतींनी हा कायदा लागू करण्यापूर्वी या कायद्याचे स्वयंमूल्यमापन करून निर्णय घ्यावा, अशी विनंती करीत या कायद्याच्या विरोधात अतिशय शांत आणि शिस्तबद्धरीतीने मोर्चा काढण्यात आला.
नागरिकत्व कायद्याविरोधात लातुरात भव्य मोर्चा; शांततेचे दर्शन
लातूर शहरात नागरिकत्व दुरुस्ती कायदा #CAA च्या विरोधात 'आम्ही लातूरकर' च्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला. शहरातील गंजगोलाई ते तहसील कार्यालय दरम्यान काढण्यात आलेल्या या मोर्चात मोठ्या संख्येने लातूरकरांनी सहभाग नोंदवला होता.
भिवंडीत एनआरसी व सीएबी विरोधात रिक्षा संघटनांचा बंद
केंद्र सरकारने देशभरात एनआरसी व सीएबी कायदा लागू केला. मात्र हा कायदा देशात हिंदू - मुस्लिम असा भेदभाव निर्माण करत आहे आणि संविधानाचे कलम १४ चे उल्लंघन करणारा आहे, असा आरोप करत सोमवारी भिवंडी शहरातील १९ रिक्षा संघटनांनी एकत्र येत मोर्चा काढला. केंद्र शासनाच्या निर्णयाचा निषेध करीत हजारो रिक्षाचालकांनी रिक्षा बंद ठेवल्या. त्यामुळे प्रवाशांसह नागरिक, शालेय विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल झाले आहेत.
जालन्यात नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या विरोधात रॅली
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याच्या समर्थनार्थ रविवारी काही राजकीय पक्ष, संघटना आणि संस्थांनी रॅली काढली होती. त्या पार्श्वभूमीवर सोमवारी या कायद्याच्या विरोधात जालन्यात रॅली काढण्यात आली. रॅली दरम्यान मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
NRC आणि CAA विरोधात भोकरदनमध्ये कडकडीत बंद
एनआरसी आणि सीएए कायद्याच्या विरोधात सोमवारी भोकरदनमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. तसेच सर्व समाज बांधवांच्या वतीने भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. भोकरदन शहरातून ११० मीटर लांबीच्या तिरंगा ध्वजाची रॅली काढून मोदी सरकार विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. नवीन तहसील कार्यालय पर्यंत शांततेत मोर्चा काढून कार्यालयाजवळ पोहोचल्यावर मोर्चाचा समारोप करण्यात आला.
हेही वाचा... राघोबादादा जरा आनंदीबाईला आवरा.. महिला शिवसैनिकांनी अमृता फडणवीसांच्या फोटोला मारले जोडे