महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

भाजपाच्या माघारीनंतर स्थायी समिती अध्यक्षांच्या विभागातील प्रस्ताव मंजूर

राज्यात शिवसेना आणि भाजपा युती तुटल्यावर भाजपा आक्रमक झाली आहे. गेल्या वर्षभरात राज्यात आणि मुंबई महापालिकेत भाजपकडून शिवसेनेला कोंडीत पकडले जात आहे.

मुंबई महापालिका
मुंबई महापालिका

By

Published : Feb 24, 2021, 9:59 PM IST

मुंबई -राज्यात शिवसेना आणि भाजपा युती तुटल्यावर भाजपा आक्रमक झाली आहे. गेल्या वर्षभरात राज्यात आणि मुंबई महापालिकेत भाजपकडून शिवसेनेला कोंडीत पकडले जात आहे. पालिकेतील सत्ताधारी असलेल्या शिवसेनेच्या स्थायी समिती अध्यक्षांच्या प्रभागातील प्रस्ताव ऐनवेळी मंजुरीला आले होते. हे प्रस्ताव स्थायी समितीत भाजपाने रोखून धरले. मात्र सर्वपक्षीय नगरसेवकांनी विनंती केल्यावर भाजपाने आपल्या भूमिकेवरून माघार घेतली. यामुळे स्थायी समिती अध्यक्षांच्या विभागातील प्रस्तावांना मंजुरी मिळाली.

भाजपाच्या माघारीनंतर स्थायी समिती अध्यक्षांच्या विभागातील प्रस्ताव मंजूर

प्रस्ताव रोखले -

मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीत अध्यक्ष यशवंत जाधव यांच्या विभागातील गरीब गरजू लोकांना फळे भाज्या यांची विक्री करण्यासाठी टाटा व्हॅनचा पुरवठा करणे, कचरा टाकण्यासाठी मोठे डबे पुरवणे, तरुणांसाठी व्यायाम साहित्याचा पुरवठा करणे, शाळांमधील विद्यार्थ्यांना स्टेनलेस स्टीलचे बेंचेस आणि कॉम्प्युटर पुरवणे, सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे आणि हाय मास्ट बसविणे आदी कामांच्या १२ कोटी रुपयांचे प्रस्ताव ऐनवेळी सादर करण्यात आले होते. पालिकेच्या नियमानुसार तीन दिवस आधी प्रस्ताव येणे अपेक्षित असताना हे प्रस्ताव आज बैठकीच्या दिवशी सकाळी दहा वाजता पाठवण्यात आले. नियमानुसार हे प्रस्ताव आधीच आले नसल्याने त्याचा अभ्यास करता आलेला नाही असे सांगत हे प्रस्ताव पटलावर घेऊ नये अशी मागणी भाजपाचे स्थायी समिती सदस्य भालचंद्र शिरसाट यांनी केली.

अध्यक्षांची भाजपाला विनंती -

यावर विरोधी पक्षनेते रवी राजा, समाजवादी पक्षाचे गटनेते रईस शेख, राष्ट्रवादी पक्षाच्या गटनेत्या राखी जाधव यांनी, आर्थिक वर्ष संपत असल्याने हे प्रस्ताव मंजूर होणे गरजेचे आहे. नगरसेवकांच्या कामात भाजपाने राजकारण करू नये असे सांगत हे प्रस्ताव मंजूर करण्यास पाठिंबा द्यावा अशी विनंती केली. याला भाजपने दाद न दिली नाही. भाजपचे भालचंद्र शिरसाट, गटनेते प्रभाकर शिंदे यांची सभागृह नेत्या विशाखा राऊत, विरोधी पक्षनेते रवी राजा यांच्याशी शाब्दिक चकमकही झाली. स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी, स्वतः भाजपचे गटनेते प्रभाकर शिंदे, भालचंद्र शिरसाट यांची समजूत काढत त्यांना विकास कामांबाबतचे प्रस्ताव असल्याचे सांगत ते प्रस्ताव मंजूर करण्यासाठी विनंती केली. प्रस्ताव मंजूर न झाल्यास वेगळा संदेश जाईल व त्याचा अपलाभ प्रशासन घेईल आणि पुढे तुमच्या नगरसेवकांचे प्रस्ताव मंजुरीला आल्यास व ते जर कोणी अडवल्यास तीच प्रथा पडू शकते, असे सांगत गर्भित इशाराही देण्याचा प्रयत्न यशवंत जाधव यांनी दिला. अखेर पुन्हा एकदा जाधव यांनी भाजपचे शिंदे, शिरसाट यांना विनंती केल्यावर १२ पैकी ५ प्रस्ताव राखून ठेवत ७ प्रस्ताव मंजूर करण्यात आले.

कॅगकडे तक्रार -

सर्वपक्षीय गटनेते, स्थायी समिती अध्यक्ष यांनी वारंवार विनंती केल्याने भाजपने त्याचा सहानुभूतीपूर्वक विचार केला. नगरसेवकांच्या कामाचे प्रस्ताव असल्याने आम्ही त्याला मान्यता दिली. मात्र त्यापैकी अनेक प्रस्तावाबाबत कॅगकडे तक्रार केली असल्याची माहिती भाजपाचे स्वीकृत नगरसेवक व स्थायी समिती सदस्य भालचंद्र शिरसाट यांनी दिली.

सोयीस्कर राजकारण -

भाजपावाले सोयीस्कर काम करत आहेत. २८ फेब्रुवारीला कामाचे आदेश निघायला हवेत. जनतेच्या कामात राजकारण करू नका अशी भाजपाला विनंती केली होती. मात्र ते महापालिका निवडणूक येणार असल्याने राजकारण करत आहेत असा आरोप विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी केला आहे.

हेही वाचा-रुग्ण वाढ सुरुच; बुधवारी राज्यात 8807 नवीन कोरोनाबाधित, 80 मृत्यू

ABOUT THE AUTHOR

...view details