महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

कोरोना रुग्णवाढ : 'या' जिल्ह्यांमध्ये प्रतिबंधित क्षेत्रे जाहीर करण्याच्या सूचना - कंटेन्मेंट झोन

राज्यातील अमरावती, यवतमाळ, अकोला या जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत.

कोरोना
कोरोना

By

Published : Feb 18, 2021, 8:26 PM IST

मुंबई - राज्यातील अमरावती, यवतमाळ, अकोला या जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत. या जिल्ह्यातील ज्या भागात रुग्ण संख्या जास्त आढळून येत आहे तेथे कंटेन्मेंट झोन जाहीर करुन तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश मुख्य सचिव संजय कुमार यांनी आज या तीन जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना दिले.

प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे निर्देश -

अमरावती जिल्ह्यातील अचलपुर तालुका, अमरावती महापालिका क्षेत्र, यवतमाळ जिल्ह्यातील यवतमाळ, पुसद आणि पांढरकवढा नगरपरिषद क्षेत्र आणि अकोला जिल्ह्यातील अकोट व मुर्तीजापूर तालुका आणि अकोला महापालिका क्षेत्र या भागामध्ये कोरोनाचे रुग्ण सर्वाधिक आढळून येत आहेत. या भागातील संसर्ग रोखण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी हे सर्व क्षेत्र कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर करुन प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे मुख्य सचिवांनी निर्देश दिले आहेत.

दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर-

अकोला जिल्ह्याचा कोरोना रुग्ण संख्येचा दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर हा 32 टक्के असून आठवड्याचा पॉझिटिव्हिटी दर 24 टक्के आहे. अमरावती जिल्ह्याचा दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर 48 टक्के असून आठवड्याचा 35 टक्के आहे. तर यवतमाळ जिल्ह्याचा दैनंदिन आणि आठवड्याचा पॉझिटिव्हिटी दर 15 टक्के आहे. संपूर्ण राज्याचा दैनंदिन पॉझिटिव्हिटी दर हा 8.8 टक्के असून आठवड्याचा पॉझिटिव्हिटी दर 7.76 टक्के एवढा आहे.

आढावा बैठक -

राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी नुकतीच सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त, पोलीस प्रशासन यांची आढावा बैठक घेतली होती. या बैठकीत घेण्यात आलेल्या विविध निर्णय तसेच उपाययोजनांबाबत सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ.प्रदिप व्यास यांनी पत्राद्वारे कळविले आहे.

कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे प्रमाण वाढवा -

सर्वाधिक प्रादुर्भाव असलेल्या जिल्ह्यांमध्ये कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचे प्रमाण वाढवावे. एका रुग्णामागे किमान 20 ते 30 निकट सहवासितांची तपासणी करुन चाचण्यांचे प्रमाण वाढवावे आणि पॉझिटिव्हिटी दर 10 टक्क्यांपेक्षा खाली आणावा, असे निर्देश आरोग्य विभागाच्या प्रधान सचिवांनी सर्व जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांना दिले आहेत. ज्या भागात नवीन रुग्ण आढळून येत आहेत. त्यांच्या 20 पट अधिक चाचण्यांची संख्या वाढविण्याचे तसेच लक्षणे असलेल्या रुग्णांची आरटीपीसीआर चाचणी करण्याची सूचना देण्यात आली आहे. ज्या ठिकाणी सिटीस्कॅन चाचणी केली जाते. तेथे कोरोनाचा संशयित रुग्ण आढळल्यास त्याबाबत जिल्हा प्रशासनाला माहिती कळविणे बंधनकारक करण्यात आले आहे.

निर्जंतुकीकरण करावे -

सार्वजनिक ठिकाणी विशेषत: सार्वजनिक स्वच्छता गृह, बस आणि रेल्वे स्थानके अशा ठिकाणी निर्जंतूकीकरण स्थानिक प्रशासनाने करावे. सार्वजनिक, धार्मिक आणि राजकीय कार्यक्रमांमध्ये मर्यादित स्वरुपाची उपस्थिती आणि मास्कचा वापर, सुरक्षित अंतर राहील याकडे प्रशासनाने लक्ष द्यावे. सर्व आरोग्य यंत्रणांची दुरुस्ती करण्यात यावी. जिल्ह्यांमध्ये रुग्ण संख्या वाढत असून यंत्रणांनी अधिक सतर्क राहून प्रभावी उपाययोजनांची कडक अंमलबजावणी करावी, असे आवाहन या पत्राद्वारे करण्यात आले आहे.

हेही वाचा-महाराष्ट्रात कोरोना रुग्णसंख्येचा आलेख चढता; विदर्भामध्ये स्थिती चिंताजनक

ABOUT THE AUTHOR

...view details