मुंबई - माजी सभापती शिवाजीराव देशमुख यांच्या निधनाने रिक्त झालेल्या विधानपरिषदेच्या एका रिक्त जागेसाठी भाजप-शिवसेनेच्या वतीने पृथ्वीराज देशमुख यांनी उमेदवारी अर्ज सोमवारी दाखल केला. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पश्चिम महाराष्ट्रात आपले राजकीय स्थान मजबूत करण्यासाठी मराठा समाजातील देशमुखांना उमेदवारी देण्याची खेळी भाजपने खेळली आहे.
विधानसभा सदस्य या निवडणुकीसाठी मतदान करणार असल्याने आणि भाजप-शिवसेना यांचे विधानसभेत बहुमत असल्याने देशमुख यांचा विजय निश्चित मानला जात आहे. या जागेसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी मंगळवारी २८ तारखेपर्यंत दुपारी ३ वाजेपर्यंतची वेळ असून काँग्रेस-राष्ट्रवादीतर्फे उमेदवारी अर्ज दाखल केला जाण्याची शक्यता धूसर आहे. विरोधकांकडून कुणाचाच अर्ज न आल्यास देशमुख हे बिनविरोध निवडले जातील.
देशमुख यांनी निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र भोळे यांच्याकडे विधानभवनात येऊन आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई, महसूल मंत्री चंद्रकांतदादा पाटील, शिवसेना प्रवक्त्या आमदार डॉ.नीलम गोऱ्हे, कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत, आमदार आशिष शेलार, आमदार अजय चौधरी, आमदार योगेश सागर आणि आमदार सुरेश केळकर उपस्थित होते.