मुंबई -राफेल प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने एक याचिका फेटाळली असल्याचा निकाल दिला. परंतु, एकूण निकाल वाचल्यास याप्रकरणाची इतर यंत्रणांकडून म्हणजेच 'सीबीआय' अथवा संयुक्त संसदीय समितीकडून चौकशी करता येऊ शकते, असे स्पष्ट संकेत त्यात दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणाची सीबीआय आणि संयुक्त संसदीय समितीकडून चौकशी करावी, अशी मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी आज शुक्रवारी मुंबईत पत्रकार परिषदेत केली.
हेही वाचा... देवेंद्र फडणवीसांच्या 'मी पुन्हा येईन' वर शरद पवारांची टोलेबाजी
टिळक भवन येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत चव्हाण यांनी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल वाचून त्याविषयी पुन्हा नव्याने तपास कसा होऊ शकतो, याची माहिती दिली. न्यायालयाने नुकत्याच दिलेल्या आपल्या निकाल पत्रात या प्रकरणाचा तपास करण्यासाठी आम्हाला मर्यादित अधिकार असले, तरी यात चौकशी केली जाऊ शकते, असे म्हटले आहे. तसेच या पुनर्विचार याचिकेत ललिता कुमारी यांच्या खटल्याचा दाखला देत सीबीआय चौकशीची मागणी केली होती. त्यामुळे आम्ही जरी चौकशी करू शकलो नाही, तरी सीबीआय सारखी संस्था चौकशी करू शकते, असेही न्यायालयाने स्पष्ट केले असल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.
हेही वाचा... काँग्रेस नेत्यांनी घेतली सोनिया गांधींची भेट; महाराष्ट्रात सत्ता स्थापनेच्या घडामोडींना वेग