महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

झारखंडमध्ये भाजप पुन्हा सत्तेत येणार नाही हे जवळपास निश्चितच होतं - पृथ्वीराज चव्हाण

महाराष्ट्रापाठोपाठ भाजप झारखंडमध्ये देखील सत्तेपासून दूर राहणार आहे. सोमवारी झारखंड विधानसभेचे निकाल जाहीर झाले असून काँग्रेस आणि जेएमएम आघाडीला स्पष्ट बहुमत मिळाले. याच पार्श्वभूमीवर आणि राज्यातील मंत्रिमंडळ विस्ताराबाबत राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी केलेली चर्चा...

Prithviraj Chavan
पृथ्वीराज चव्हाण

By

Published : Dec 24, 2019, 8:08 AM IST

Updated : Dec 24, 2019, 11:39 AM IST

मुंबई -झारखंडमध्ये भाजपची सत्ता पुन्हा येणार नाही. हे जवळपास निश्चितच होतं, असे मत माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले. या पराभवाची सुरुवात खरे तर गुजरात विधानसभा निवडणुकीपासून झाली होती. मात्र ती निवडणूक भाजपने जिंकली. त्यानंतर मात्र झालेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत लोकांनी भाजपच्या धोरणांना मतपेटीच्या माध्यमातून आपला विरोध दाखवून दिला, असे चव्हाण यांनी म्हटले.

माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची ईटीव्ही भारतने घेतलेली खास मुलाखत...

हेही वाचा... भाजपला उतरती कळा, अहंकारी राजकारणाला झारखंडने नाकारले - शरद पवार

झारखंड निवडणूक देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी प्रतिष्ठेची केलेली होती. मात्र मतदारांनी त्यांच्या या भूलथापांना न भुलता काँग्रेस पक्षाला मत दिले आहे. भाजपने देशात सुधारित नागरिकत्व कायदा लागू करून देशात रोवलेली दुहीची बीज, अर्थव्यवस्थेचे वाजवलेले तीनतेरा आणि शेती रोजगार याबाबत मारलेल्या थापा आता त्यांनाच भारी पडत आहेत. लोकांनी मतपेटीतून त्यांना त्यांची जागा दाखवायला सुरुवात केली आहे. खुद्द भाजप सरकारचे माजी आर्थिक सल्लागार अरविंद सुब्रमण्यम यांनी देशाची अर्थव्यवस्था आयसीयूमध्ये असल्याचे सांगितले. हे सारे पाहता भाजपची पीछेहाट सुरू झाली असून हाच कल पुढीलवर्षी होणाऱ्या दिल्ली आणि बिहार विधानसभा निवडणुकीत कायम राहिलेला आपल्याला दिसेल, असेही पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे.

हेही वाचा... 'झारखंडमध्ये भाजपच्या जनविरोधी धोरणांचा पराभव'

नीट पाहिले तर भाजपच्या काही चुकीच्या धोरणाचा परिणाम म्हणून मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान या तीन राज्यात त्यांची असलेली सत्ता हातून गेली. तर हरियाणा आणि महाराष्ट्र या दोन राज्यात त्यांचा जनाधार आधी पेक्षा कमी झाला. असे असले तरीही काँग्रेसने खूप चांगले प्रदर्शन केले असे आपण म्हणणार नाही, असेही चव्हाण यांनी नमुद केले.

या दोन्ही राज्यात काँग्रेसला अजून फार काम करावे लागेल. दुसरीकडे लोकांचा कल पाहिला तर पाकिस्तान, कलम 370 यासारख्या मुद्द्यांवर लोकसभा निवडणुकीत भरगोस यश मिळत असले तरीही राज्याच्या निवडणुकीत मात्र लोक वेगळा विचार करतात. रोजगार, शेती, अर्थकारण याचे प्रश्न सोडवले नाही, तर तुम्हाला सत्तेतून खाली खेचायला मागे पुढे पहात नाहीत हेच आजच्या निकालातून स्पष्ट होत असल्याचे चव्हाण यांनी म्हटले आहे.

हेही वाचा... लोकशाही वाचवण्यासाठी एकत्र येऊ, ममता बॅनर्जींचे शरद पवारांना पत्र

मंत्रिमंडळ विस्तारावर एक दोन दिवसात तोडगा

देशात परिस्थिती अस्थिर असताना राज्यातील महाविकास आघाडी सरकारला मंत्रिमंडळ विस्तार करायला होत असलेल्या विलंबाबाबत चव्हाण यांना विचारले असता, तीन पक्षांचा सरकारचा प्रयोग राज्यात पहिल्यादा होत असून त्यामुळे थोडा विलंब होत असल्याचे त्यानी मान्य केले. मात्र, येत्या एक दोन दिवसात हा प्रश्न सुटेल असेही त्यांनी स्पष्ट केले.

पक्षातील तरुण आमदारांना मंत्रिपदाची संधी मिळायला हवी

काँग्रेस पक्षात मंत्रिपद मिळवण्यासाठी अनेकजण उत्सुक आहेत. मात्र दोन तीन वेळा आमदार झालेल्या तरुणांना आता आपल्याला मंत्रिपद मिळावे, असे वाटण सहाजिकच आहे. त्यांना नक्की संधी द्यायला हवी, अशी भूमिका चव्हाण यांनी मांडली आहे. याबाबत पक्षश्रेष्ठी नक्की योग्य विचार करून निर्णय घेतील हे देखील त्यानी स्पष्ट केले.

हेही वाचा... उद्धव ठाकरेंबद्दल आक्षेपार्ह पोस्ट करणाऱ्यास शिवसैनिकांची मारहाण

माझ्यावरील जबाबदारी मला विचारूनच पक्षश्रेष्ठी ठरवतील

काँग्रेस पक्षातील कोण कोण चेहरे मंत्रिमंडळात सामील होणार, याबाबत सस्पेन्स कायम असला तरीही पृथ्वीराज चव्हाण यांना प्रदेशाध्यक्षपद मिळेल अशी चर्चा आहे. मला विधानसभा अध्यक्षपदाबाबत विचारले होते. मात्र प्रदेशाध्यक्ष पदाबाबत अजून काहीही विचारलेले नाही. ही सगळी माध्यमातील चर्चा असून ती करण्याचा तुम्हाला पूर्ण हक्क आहे. मात्र माझ्याबाबत कोणताही निर्णय घेण्यापूर्वी पक्षश्रेष्ठी मला एकदा नक्की विचारतील आणि ते देतील ती जबाबदारी पूर्ण ताकतीने पार पडण्याची आपली तयारी असेल, असे पृथ्वीराज चव्हाण यांनी ईटीव्ही भारतासोबत बोलताना स्पष्ट केले आहे.

Last Updated : Dec 24, 2019, 11:39 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details