मुंबई- मार्च २०२१ मध्ये उघडकीस आलेल्या पोलीस बदली घोटाळा प्रकरणी पोलिसांनी विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना बीकेसी सायबर पोलीस ठाण्यात चौकशीला हजर राहण्याची नोटीस बजावली होती. मात्र गृहमंत्री आणि पोलिसांच्या झालेल्या बैठकीनंतर पोलीस स्वतः फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर जाऊन त्यांचा जबाब घेणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तत्पूर्वी मुंबई पोलिसांकडून नोटीस प्राप्त झाली असून, मी उद्या सकाळी अकरा वाजता बीकेसी सायबर पोलीस ठाण्यात चौकशीला जाणार आहे, असं फडणवीस म्हणाले होते. तसेच पोलिसांना सर्व सहकार्य करणार असल्याचेही त्यांनी पत्रकारपरिषदेत सांगितले होते.
पोलीस बदली घोटाळा.. बंगल्यावर जाऊनच पोलीस करणार देवेंद्र फडणवीसांची चौकशी काय आहे प्रकरण?
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी 2021 मध्ये गृह विभागातील पोलीस बदलीचा घोटाळा उघड केला होता. या संदर्भातील ट्रान्सस्क्रिप्ट, पेन ड्राईव्ह माझ्याकडे असल्याचे सांगितले होते. देशाच्या होम सेक्रेटरीना या संदर्भातील पुरावे दिले होते. न्यायालयाने याची गंभीर दखल घेत सीबीआयकडे हे प्रकरण सुपूर्द केले होते. सध्या या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. गुप्तचर यंत्रणेच्या माजी प्रमुख व वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांनी हे संभाषण रेकॉर्ड केल्याचे म्हटले जात आहे. या प्रकरणात मुंबई सायबर सेलकडून रश्मी शुक्ला यांची देखील चौकशी सुरु आहे. रश्मी शुक्ला यांनी या प्रकरणात सायबर सेलकडे जवाब नोंदवला आहे. मुंबई सायबर सेलकडून किला कोर्टात सांगण्यात आले होते की, या प्रकरणात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची साक्ष देखील महत्त्वाची असणार आहे. फडणवीस यांना सायबर सेल कडून अनेक समन्स देखील पाठवण्यात आले होते. मात्र ते चौकशीला आले नसल्याचे मुंबई सायबर सेलने न्यायालयात सांगितले होते.
पेन ड्राईव्ह सायबर सेलला देण्याचे आदेश -
केंद्रीय गृहमंत्रालयाकडे असलेले पेनड्राईव्ह 25 तारखेपर्यंत राज्य सरकारला मिळणे अपेक्षित आहे असे आजच्या सुनावणीच्यावेळी म्हणले आहे. देवेंद्र फडणवीस यांनी आयपीएस बदल्यासंदर्भात आरोप असलेले 6 जीबी डेटा असलेले पेनड्राईव्ह आणि काही कागदपत्र गेल्या वर्षी केंद्रीय गृहमंत्रालयाला सोपवली आहेत. तो पेन ड्राईव्ह आणि कागदपत्र राज्य सरकारला तपसासाठी परत मिळावीत यासाठी राज्य सरकारच्या वतीने कीला कोर्टात अर्ज केला होता. मात्र अद्याप तो पेनड्राईव्ह केंद्रीय गृहमंत्रालयाने राज्य सरकारला दिलेला नाही. 25 तारखेपर्यंत तो पेनड्राईव्ह राज्य सरकारला मिळत का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. या याचिकेवर पुढील सुनावणी 25 तारखेला होणार आहे.
फडणवीस म्हणाले..
विरोधी पक्षनेता म्हणून कोणताही घोटाळा उघड करण्याचे अधिकार आहेत. गृहमंत्री म्हणून मी काम पाहिले आहे. त्यामुळे सायबर पोलिसांकडून विचारल्या जाणाऱ्या प्रत्येक प्रश्नांची उत्तरे देणार आहे. मात्र सरकारने कितीही दबाव टाकला तरी सीबीआयकडून होणाऱ्या चौकशीत सगळा वस्तुनिष्ठ प्रकार समोर येईल, असे फडणवीस म्हणाले. अनिल देशमुख अटकेत आहेत. महत्त्वपूर्ण बाबी समोर येत आहेत. ज्यावेळी सीबीआयला चौकशी ट्रान्सफर झाली. त्यावेळी राज्य सरकारने एफआयआर दाखल केला होता. ऑफिशियल सेक्रेट् अॅक्ट मधील माहिती कशी लीक झाली असा त्यात उल्लेख आहे. यासंदर्भात पोलिसांनी मला वारंवार प्रश्नावली पाठवली. विरोधी पक्षनेता म्हणून अधिकार आहेत. मला ते प्रश्न विचारू शकत नाहीत. तरीही प्रश्नावली पाठवली असून न्यायालयात देखील उत्तरे देत नसल्याचे सांगितले आहे. शुक्रवारी मुंबई पोलिसांनी सीआरपीसी 160 ची नोटीस बजावली आहे. तसेच उद्या रविवारी सकाळी 11 वाजता बिकेसी येथे सायबर पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले आहे. त्यामुळे स्वतः जाऊन पोलिसांकडून विचारण्यात येणाऱ्या प्रश्नांना योग्य उत्तरे देईन, असे फडणवीस यांनी सांगितले.
अडकविण्याचा प्रयत्न सुरु
सरकारी वकिलामार्फत भाजपच्या नेत्यांना अडकवण्याचा प्रयत्न सुरू आहे. विधानसभेत चार दिवसांपूर्वी व्हिडिओसहित पुरावे दिले. तीन दिवसानंतर वकिलाने खुलासा केला. पोलीस आणि राज्य सरकारशी समनव्य केल्यानंतर त्याने भाष्य केल्याचे फडणवीस म्हणाले. परंतु, एक्सपर्टसोबत सल्ला मसलत केली आहे. राज्य सरकार आणि पोलिसांकडे मात्र याची उत्तरं नाहीत. त्यामुळे ते घाबरले असून, त्यांनी या प्रकरणी चौकशीसाठी बोलवले आहे. हे प्रकरण गंभीर आहे. त्यामुळे सीबीआयकडे चौकशीची मागणी करणार असल्याचे फडणवीस म्हणाले.