मुंबई - यंदाच्या निवडणुकीला एमआयएमने 52 उमेदवार उभे केले असून, आम्ही वंचित, सर्व जातीतील संधी न मिळालेल्या लोकांना आपल्या पक्षातून तिकीट दिल्याचे ओवैसी यांनी म्हटले आहे. तसेच वंचित सोबत आमची युती काही जागांच्या वादामुळे झाली नसल्याचे मी व माझ्या पक्षातील पदाधिकाऱ्यांनी अनेक वेळा सांगितल्याचे ते म्हणाले. एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी यांनी विधानसभेच्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषद घेतली. यावेळी खासदार इम्तियाज जलील व पक्षाचे राज्यातील पदाधिकारी उपस्थित होते.
2014 पासून 2018 मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. तसेच शेतकऱ्यांचे कर्ज, जीएसटी, रोजगार, असे अनेक मुद्द्यांवर दिलेले आश्वासन सरकार पूर्ण करू शकलेले नसल्याने ते त्याबद्दल भाष्य करत नाहीत, असा ओवैसींनी आरोप केला. यावेळी आर्टिकल 370 चा मुद्दा घेऊन आम्ही निवडणूक लढणार असल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच माझी राजकारणातील भूक ही मोठी असल्याने मी पक्ष वाढवत जाणार आहे, असे ते म्हणाले.