मुंबई- मुंबईमध्ये इंग्रजांच्या काळात रस्त्याचे अंतर मैलामध्ये मोजले जात होते. इंग्रजांच्या काळात मुंबई सायन आणि माहीमपर्यंत होती. इंग्रजांनी मैलाचे अंतर मोजण्यासाठी लावलेले दगड कालांतराने रस्त्याखाली गाडले गेले तर काही नाहीसे झाले. अशा 15 ऐतिहासिक मैलाच्या दगडांचे पालिकेने ( BMC ) जतन केले ( Historic Milestones in Mumbai ) आहे.
इंग्रजांनी लावले मैलाचे दगड -भारतावर दीडशे वर्षांहून अधिक काळ इंग्रजांचे राज्य होते. मुंबईचा वापर इंग्रजांनी व्यापार केंद्र म्हणून केला. त्यावेळी हार्निमन सर्कल येथून टांगा आणि बैलगाडी सुटायची. रस्त्यावरील अंतर कळावे म्हणून इंग्रजांनी प्रत्येक मैलावर मैलाचे दगड लावले. त्यावेळची मुंबई सायन आणि माहीमपर्यंत होती. सायनहून माहीम येथे जाण्यासाठी असणाऱ्या रस्त्यांवर, असे दगड लावण्यात आले होते.
पालिकेला यश -1947 ला भारत देश स्वतंत्र झाले. कालांतराने देशाचा आणखी विकास होत गेला. अनेकवेळा रस्त्यांची, फुटपाथची कामे करण्यात आली. या कामादरम्यान मैलाचे दगड रस्ते आणि फुटपाथच्या खाली गेले. काही दगड तुटले तर काही नाहीसे झाले. मुंबईचा हा ऐतिहासिक वारसा जपता यावा यासाठी पालिकेने या मैलाच्या दगडांचे जतन करण्याचा निर्णय घेतला. यासाठी पालिकेने 25 लाखांची तरतूद केली. 2017 पासून पालिकेच्या पुरातन वास्तू विभागाकडून हे दगड जतन करण्यास सुरुवात करण्यात आली. पालिकेला मिळालेल्या नोंदी प्रमाणे आतापर्यंत 15 मैलाचे दगड मुंबईत होते त्या ठिकाणी लावण्यात आले आहेत.