मुंबई- अवघ्या एका महिन्यावर पावसाळा येऊन ठेपला आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाची मान्सून पूर्व तयारी सुरू झाली ( Pre Monsoon Preparations Start ) आहे. नाले सफाई, पाणी उपसण्यासाठी पंपाची व्यवस्था, रेल्वे रूळ मार्ग सफाई, ओव्हर हेड वायरची देखभाल, झाडांच्या फांद्याची छाटणी, अशी कामे रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत आहे. आज मध्य आणि पश्चिम रेल्वेचे महाव्यस्थापक अनिल कुमार लाहोटी यांनी मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या मान्सूनच्या तयारीचा आढावा घेतला. यादरम्यान प्रधान विभागप्रमुख आणि मुंबई विभागाचे विभागीय रेल्वे व्यवस्थापकही यावेळी उपस्थित होते.
....रेल्वे अधिकाऱ्यांना सूचना -अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना महाव्यवस्थापक अनिल कुमार लाहोटी म्हणाले की, पावसाळ्याशी संबंधित सर्व कामे उद्दिष्टाच्या तारखेपूर्वी पूर्ण करावीत. सर्व असुरक्षित ठिकाणी 24 तास देखरेख ठेवण्याची आणि राज्य सरकार आणि महानगरपालिका यांच्याशी जवळीक साधून काम करण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. आगामी पावसाळ्यात सुरळीत आणि विनाव्यत्यय सेवा सुनिश्चित करण्यासाठी गाळ काढणे, कल्व्हर्ट आणि नाले साफ करणे, झाडे छाटणे, खड्डे स्कॅन करणे, पाणी साचणारी असुरक्षित असलेल्या ठिकाणी उच्च वॅटेज पंपची व्यवस्था करणे, व्यवस्था करणे, मल्टी- सेक्शन डिजिटल काउंटर इत्यादी. तयारी मध्य रेल्वेने पावसाळ्यासाठी केली आहे.
149 उच्च वॅटेज पंप बसविणार -मध्य रेल्वेच्या ( Central Railway ) मुंबई उपनगरीय नेटवर्कवर 19 असुरक्षित ठिकाणी गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी अधिक उच्च वॅटेज पंप बसविण्यात येणार आहे. मध्य रेल्वेने अतिवृष्टीदरम्यान पाणी साचणारी 19 संवेदनशील ठिकाणे निवडण्यात आली आहेत आणि या ठिकाणी 83 पंप देण्याची योजना आहे. यावर्षी एकूण 149 पंप दिले जाणार आहेत, त्यापैकी रेल्वे 118 पंप आणि बृहन्मुंबई महानगरपालिका उर्वरित 31 पंप पुरवणार आहे. यावर्षी पूर येऊ नये म्हणून पूरप्रवण ठिकाणी पंपांची क्षमता आणि पंपांची संख्या वाढवण्यात आली. मेन लाईनवर मस्जीद बंदर, माझगाव यार्ड, भायखळा, चिंचपोकळी, करी रोड, परळ, दादर, माटुंगा, शीव, कुर्ला, विक्रोळी, कांजूरमार्ग, भांडुप, मुलुंड आणि हार्बर मार्गावरील शिवडी, वडाळा, गुरु तेग बहादूर नगर, चुनाभट्टी, टिळक नगर ही ठिकाणे निवडण्यात आलेली आहेत.
नाल्यांचे गाळ काढणे -मध्य रेल्वेने आपल्या उपनगरीय विभागातील 59 किलोमीटर नाल्यांचे गाळ काढले आणि साफ केले. सध्या आणखी 59 किलोमीटर नाल्यांच्या साफसफाईचे काम प्रगतीपथावर आहे.