मुंबई - एसटी कर्मचाऱ्यांना कारवाईची नोटीस बजावून संपात फूट पडण्याचा प्रयत्न सुरू आहे. एसटी महामंडळाने कारवाईची तात्काळ नोटीस मागे घ्या, अन्यथा एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने (ST MD Shekhar Channe) यांच्या कार्यालयाला टाळे ठोकू, असा इशारा विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर (Pravin Darekar on ST strike) यांनी एसटी महामंडळाला दिला. ते आज आझाद मैदानावर बोलत होते.
विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर म्हणाले, की गेल्या काही दिवसांपासूनसंपावरअसलेल्या एसटी कर्मचाऱ्यांवर एसटी महामंडळाकडून मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू आहे. दोन हजारांपेक्षा जास्त एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाईची नोटीस बजावली आहे. याशिवाय एसटी कर्मचारी कामावर हजर होत असल्याचा खोट्या बातम्या पसरवून एसटीचा संपात फूट पाडण्याचा प्रयत्न एसटी महामंडळाकडून करण्यात येत आहे. मात्र, आम्ही एसटी कर्मचाऱ्यांना पाठीशी खंबीरपणे उभे आहोत. पहिल्या दिवसांपासून ज्या भावना आहेत, त्या आजही आमच्या आहेत. हे आंदोलन कोणत्या पक्षाचे नाही. ते गोरगरीब मराठी कर्मचाऱ्यांचे आहे. एसटी कर्मचाऱ्यांची मागणी पूर्ण होईपर्यंत हे आझाद मैदावरील आंदोलन सुरूच राहणार आहे. अभी नही तो कभी नही, असा इशाराही दरेकर (Pravin Darekar Warning to MH gov) यांनी सरकारला दिला आहे.
हेही वाचा-एसटीच्या विलीनीकरणासाठी विशेष अधिवेशन बोलवावे, नितेश राणेंची मागणी
ही लढाई आता करो या मरोची-
राज्यभरातील एसटीचे सर्व आगार बंद आहेत. आता तरी सरकारने झोपेचे सोंग घेतले ते बाजूला करावे. राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी सांगितले की, कामगारांनी दोन पावले मागे घ्यावेत. पण सरकार का दोन पावले समोर येत नाही..? असा प्रश्न ही प्रविण दरेकर यांनी सरकारला विचारला आहे. ही सरकार चर्चेला निमंत्रण देते. पण प्रत्यक्षात हवा पाण्याची चर्चा करत आहे. एसटी कामगारांच्या मागणीकडे दुर्लक्ष करत आहे. मात्र, कामगार सरकारला धडा शिकविणार आहे. ही लढाई आता करो या मरोची झाली आहे. राज्य सरकारला माझी विनंती आहे की, एसटी कामगारांचा अंत पाहू नका. उद्या आंदोलन हिंसक वळणावर आले तर त्याला राज्य सरकार जबाबदार असणार असल्याचा इशाराही प्रविण दरेकर यांनी दिला आहे.