मुंबई - राज ठाकरेंनी राज्यपालांची वाढीव वीज बिलांसंदर्भात भेट घेतली होती. यावर राज्यपालांनी ठाकरेंना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना भेटण्याचा सल्ला दिला. यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी राज्यपालांवर टीका केली आहे. भाजपचे बहुतेक नेते पवारांना नेता मानतात. आता राज्यपालही शरद पवारांना नेता मानत असतील तर आनंदच असल्याचे संजय राऊत म्हणाले. यावर विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी, संजय राऊत हे सरकारचे अपयश लपवण्यासाठी अशा टीका करत असल्याचे म्हटले आहे.
सरकार प्रश्न सोडवत नसल्यानेच नेते राज्यपालांना भेटतात - दरेकर
दरेकर म्हणाले की, यापूर्वी महाराष्ट्रातील नेते राज्यपालांना भेटले नाहीत का? राज्यपालांकडे प्रश्न घेऊन गेले नाहीत का? राज्यात अनेक समस्या आणि लोकांचे प्रश्न असताना ते सरकारकडून सोडवले जात नाही असे लोकांना वाटते. आपले प्रश्न हे राज्यपालांमार्फत सोडवले जाऊ शकतात. त्यामुळे राज्यपालांची सर्व भेट घेत आहेत. पण, सरकारमधील नेतेमंडळी हे लक्ष विचलित करण्यासाठी अशी वक्तव्य करत आहेत. राज ठाकरे हे मुख्यमंत्र्यांकडे गेले नाहीत कारण मुख्यमंत्री हे न्याय देत नाहीत, म्हणून सर्व राज्यपालांना भेटत आहेत. त्यामुळे तुमच्या सरकारकडून लोकांना न्याय मिळत नाही म्हणून लोकं राज्यपालांकडे जात आहेत. त्यामुळे तुम्ही न्याय न देऊन महाराष्ट्राचा अपमान करत आहात, असे प्रवीण दरेकर म्हणाले.