मुंबई - मालाड येथील क्रीडांगणाला टिपू सुलतान यांचे नाव देण्यावरून राजकारण चांगलेच तापले असताना, शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी भाजपवर सडकून टीका केली आहे. या टीकेला उत्तर देताना विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी महाविकास आघाडीचा भरपूर समाचार घेतला आहे. मुंबईत आपल्या निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
प्रवीण दरेकरांची प्रतिक्रिया - 'राऊत यांना भाजप द्वेषाची कावीळ!' -
नौटंकी करणाऱ्याला इतर गोष्टी नौटंकीच दिसणार, दृष्टी तशी सृष्टी असे सांगत भाजप द्वेष करणाऱ्या संजय राऊत यांना भाजप द्वेषाची कावीळ झाली आहे असा टोला प्रवीण दरेकर यांनी लगावला आहे. सत्तेसाठी ज्यांच्या मांडीला मांडी लावली त्यांच्याकडून काय अपेक्षा केली जाऊ शकते असे सांगत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी कर्नाटकमध्ये टिपू सुलतान यांचा कुठलाही गौरव केला नाही. तसेच शेकडो हिंदूंना टिपू सुलतानने फाशी दिली. लाखो हिंदूंचे धर्मांतर जबरदस्तीने केले. हजारो मंदिरांचा विध्वंस केला. अनेक मुली-महिलांवर बलात्कार केले, या टिपू सुलतानला डाव्या पुरोगामी धर्मनिरपेक्ष लोकांनी या क्रूरक्रमाला महान योद्धा म्हणून दाखवले आहे. याला काय म्हणणार? असेही प्रवीण दरेकर म्हणाले. टिपू सुलतानला दक्षिणेचा औरंगजेब असे म्हटले जायचे. हिंदूंच्या भावनांवर प्रहार करण्याचे काम त्याने केले आहे. हिंदूंचा मराठा साम्राज्य उद्ध्वस्त करण्याचे काम सुद्धा टिपू सुलतान यांनी केले आहे आणि सत्तेसाठी हे सर्व केले जात असल्याचा आरोप प्रवीण दरेकर यांनी यावेळी लगावला आहे.
- 'नवाब मलिक हे हिंदुद्वेष्टे!' -
नवाब मलिक यांनी टिपू सुलतानचं नाव आल्यावर कौतुक करायचा प्रश्नच येत नाही. हिंदू बरोबर क्रिश्चन समाजावर त्यांनी अन्याय केले आहे. नवाब मलिक मुस्लिम असल्याने ते हिंदुद्वेष्टे आहेत. मुंबईमध्ये भायखळा येथे उर्दू भाषा भवन करण्यामागे काय उद्देश होता? त्याचबरोबर त्याच्या आसपास चार ते पाच केंद्र असताना मुस्लिम समाजाची मते घेण्यासाठी फक्त हे सर्व सुरू आहे. तर दुसरीकडे मालाड येथे असलम शेख सुद्धा हेच करत आहेत असा आरोपही प्रवीण दरेकर यांनी या प्रसंगी लावला. अस्लम शेख काँग्रेसचे आहेत, नवाब मलिक राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. शिवसेनेची याबाबत दुटप्पी भूमिका आहे. एकीकडे शिवसेनेचे आदित्य ठाकरे म्हणतात की असा कुठलाही प्रस्ताव त्यांच्याकडे आलेला नाही. तर दुसरीकडे पालकमंत्री हे स्वतः नामांतर करतात याला काय म्हणायचे? या तिन्ही पक्षांना सत्ता महत्त्वाची असल्याचंही दरेकर यांनी म्हटले आहे.
- नितेश राणेंबद्दल काय म्हणाले दरेकर?
नितेश राणेयांना सर्वोच्च न्यायालयाचा 100% दणका असे मानायचे काही कारण नाही. त्यांना अंशता दिलासा दिला गेला आहे. या सरकारचा अट्टाहास, उद्देश एकच आहे की नितेश राणे यांना याच्या मध्ये अटक करण्याचा कसोशीने प्रयत्न हे सरकार करत आहे. यासाठी विशेष वकील, कौन्सिल यांच्यामार्फत त्यांचे काम सुरू आहे. परंतु सर्वोच्च न्यायालयाने १० दिवसांची मुदत नितेश राणे यांना दिली आहे. आता ते सेशन कोर्टात हजर होतील. नितेश राणे दोषी नसल्याचे संदर्भामध्ये विधी तज्ञ मुकुल रोहतगी यांनी बाजू मांडली आहे. त्या संदर्भात सेशन कोर्टात नितेश राणे आपली बाजू मांडतील व त्यांना नक्कीच दिलासा भेटेल. यामध्ये दोन पर्याय असतात एक तात्काळ अटक होते तर दुसरं अटक झाल्यावर जामीन मंजूर होऊ शकतो. या संदर्भात नितेश राणे योग्य ती पावले उचलतील असेही प्रवीण दरेकर यांनी सांगितल आहे.
हेही वाचा -Tipu Sultan Sports Complex controversy : टिपू सुलतान नावावरून भाजपची दुटप्पी भूमिका, सचिन सावंत यांची टीका