मुंबई :महाराष्ट्राच्या जनतेसाठी राज्य सरकारचे दोन वर्षातील योगदान व सरकारची पुढील दिशा काय असेल याची माहिती राज्याच्या कोटयवधी जनतेला आजच्या भाषणातून मिळेल अशी अपेक्षा होती. परंतु मुंबई महापालिकेच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मुंबईत काय कामं झाली हे दाखविण्याचा प्रयत्न करण्यात आला अशी टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी मुख्यमंत्र्यांच्या दसरा मेळाव्यातील भाषणावरून केली. परंतु मुंबईच्या कामाची काय स्थिती आहे.हे मुंबईकरांना चांगलेच माहित आहे. आजच्या भाषणामध्ये देवेंद्रजी फडणवीस व भाजपा विषयीचा टोकाचा तिरस्कार व पोटशूळ व्यक्त होताना दिसला असेही दरेकर म्हणाले.
हिंदुत्व व मराठीविषयीची भूमिका पुन्हा अधोरित करण्याचा प्रयत्न
शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज शिवसेना दसरा मेळाव्यात केलेल्या भाषणासंदर्भात प्रसिध्दीमाध्यमांशी बोलताना दरेकर यांनी सांगितले की, हिंदुत्व व मराठीविषयीची भूमिका पुन्हा अधोरित करण्याचा उध्दव ठाकरे यांनी प्रयत्न केला. त्यांना पुन्हा आज हिंदुत्वाचा विषय उपस्थित करावा लागला हे सुध्दा उल्लेखनीय आहे. कारण हिंदुत्वाच्या विरोधात सातत्याने गरळ ओकणा-यांच्या बाजूला केवळ सत्तेसाठी मांडीला मांडी लावून आचार विचार बाजूला सोडून शिवसेना सत्ता उपभोगत आहे. भाजापावर सत्तेसाठी वाटेल ते अथवा सत्तापिपासू अशी टीका करणे नेमक्या शिवसेनेच्या कोणत्या संस्कृतीत बसते असा सवालही दरेकर यांनी केला.