मुंबई -एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरी नंतर राज्याचे राजकरण ढवळून निघाले आहे. शिवसेनेत गळती चालू आहे. उद्धव ठाकरे यांच्या भावनिक आवाहनाचाही आमदारांवर प्रभाव झाल्याचे दिसून येत नाही. शिवसेना खिळखिळी होण्याची शक्यता आहे. मात्र, या प्रकरणावर भाजप सायलंट मोडवर असल्याची चर्चा आहे. मात्र, आता भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी या विषयावर प्रतिक्रिया दिली. पण, त्यांनी सध्याच्या परिस्थितीवर थेट राज्यपालांना तक्रार केली आहे. राजकीय स्थिती अस्थिर असून अंधाधुंद निर्णय घेतले जात आहेत. राज्यपाल यांनी यात हस्तक्षेप करावा, अशी विनंती अर्जातून करण्यात आली आहे.
हेही वाचा -VIDEO : महाविकास आघाडी मजबूत, अडिच वर्षे पूर्ण करणार, आव्हान देणाऱ्यांनी मुंबईत यावे - संजय राऊत
दरेकर यांनी पत्राबाबत ट्विटकरून माहिती दिली आहे. ट्विटमध्ये, राज्यातील अस्थिर राजकीय स्थिती आणि त्या पार्श्वभूमीवर गेले दोन दिवसांपासून अंधाधुंद घेतले जात असलेले निर्णय, जारी होत असलेले जीआर आणि त्यात तातडीने आपला हस्तक्षेप होण्याबाबत राज्यपाल भगतसिंग कोश्यारीजी यांना आज पाठविलेले पत्र, असे लिहिण्यात आले आहे. त्याचबरोबर पत्र देखील ट्विट करण्यात आले आहे.
भाजपचा वेट अँड वॉच -सत्ता परिवर्तनाबाबत आपल्याला माहिती नाही. सध्या राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडींमध्ये भाजपचा कोणताही संबंध नाही. त्यामुळे, आम्ही वेट अँड वॉच च्या भूमिकेत आहोत, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले. शिवाय शरद पवार आणि संजय राऊत काय बोलतात हे माध्यमांच्या माध्यमातूनच समजत आहे. पण, त्या दोघांना अभिव्यक्ती स्वातंत्र्य जरा जास्तच आहे, असेही ते म्हणाले. दरम्यान, त्यांनी अनेक प्रश्नांवर सावध प्रतिक्रिया दिली. ते कोल्हापुरात माध्यमांशी बोलत होते.
प्रस्ताव आला तर पुढे निर्णय घेऊ -यावेळी एकनाथ शिंदे यांनी बंड करून सरकारमधून बाहेर पडण्याबाबत निर्णय घेतला आहे. त्यामुळे, याबाबतच काही प्रस्ताव आला आहे का याबाबत विचारले असता ते म्हणाले, अध्याप असा प्रस्ताव आला नाहीये. जरी प्रस्ताव आला तर आमची महाराष्ट्रात 13 जणांची कोअर कमिटी आहे. त्याबाबत आम्ही चर्चा करतो, त्यानंतर तो प्रस्ताव आम्ही केंद्राकडे पाठवतो, मगच निर्णय होतो, असेही पाटील म्हणाले. त्यामुळे, प्रस्तावच अध्याप नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. शिवाय शिंदे यांच्यासोबत कोण गेलेत ? कोण जाणार आहेत ? कोण परत येणार आहे याबाबत आपल्याला काही माहिती नाही. शिवाय मोहित कंबोज गुजरात येथील विमानतळ येथे दिसले होते. याबाबत विचारले असता चंद्रकांत पाटील म्हणाले, ते सर्व पक्षातील नेत्यांचे मित्र आहेत. कदाचित ते सर्वत्र दिसतात, शिवाय शिंदे यांच्यासोबत कंबोज दिसले असतील तर ते एकनाथ शिंदे यांचे मित्र आहेत, त्यामुळे सोबत असतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा -Political crisis in Maharashtra : आदित्य ठाकरे यांचा पत्रकारांशी मध्यरात्री ऑफ द रेकॉर्ड संवाद