मुंबई - मुंबई लोकल ही मुंबईची लाईफ लाईन म्हणून ओळखली जाते. मात्र, कोरोनाच्या सावटामुळे सामान्य मुंबईकरांना अजूनही लोकल प्रवासाची मुभा देण्यात आलेली नाही. त्यामुळे दोन डोस घेणाऱ्या सामान्य मुंबईकरांना लोकल प्रवासाला मुभा देण्यात यावी, अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे. राज्य सरकारने याबाबत लवकरात लवकर निर्णय घ्यावा, असेही दरेकर म्हणाले आहेत. जर, राज्य सरकारने याबाबत निर्णय घेतला नाही, तर भारतीय जनता पक्ष याबाबत तीव्र आंदोलन करेल, असा इशाराही दरेकर यांनी दिला आहे. आज त्यांच्या शासकीय निवस्थानी पत्रकारांशी ते बोलत होते.
विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर माध्यमांशी बोलताना 'मुख्यमंत्र्यांनी दिले होते आश्वासन'
कोरोना चाचणीचे दोन डोस घेणाऱ्या नागरिकांना लोकल प्रवासाची मुभा देण्यात यावी अशी मागणी दरेकर यांनी केली होती. त्यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी याबाबत लवकरात लवकर निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले होते. मात्र, अद्याप याबाबत कोणताही निर्णय घेतला गेलेला नाही.
मुंबई तिसऱ्या लेवलचे निर्बंध
मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येत घट होत आहे. तरीही राज्यात सर्वात जास्त रुग्ण संख्या असलेल्या 10 जिल्ह्यांपैकी एक मुंबई आहे. त्यामुळे अद्यापही मुंबईत तिसऱ्या लेवलचे निर्बंध आहेत. या निर्भंधानुसार केवळ अत्यावश्यक सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच लोकल प्रवासाची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे उपनागरातून मुंबईत येणाऱ्या कामगार वर्गाला बस किंवा इतर वाहनांतून प्रवास करून कार्यालय गाठावे लागते. मात्र, यामुळे मुंबईकरांचा रोज वेळ आणि पैसे वाया जात आहे. त्यामुळे लोकलसेवा सुरू नसल्याने, सामान्य मुंबईकरांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.