मुंबई -माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त सामनाला त्यांनी मुलाखत दिली आहे. शिवसेना खासदार, सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंची मुलाखत घेतली आहे. त्यामध्ये बऱ्याच गोष्टींचा उलगडा उद्धव ठाकरे यांच्याकडून करण्यात आलेला आहे. यावरुन भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. उद्धव ठाकरेंनी सत्तेची लालसा, चटक ठेवली नसती, तर आज एकनाथ शिंदे बाहेर पडले नसते, अशी टीका प्रवीण दरेकरांनी केली आहे. मुंबईतील निवासस्थानी ते प्रसारमाध्यमांशी बोलत ( Pravin Darekar attacks uddhav thackeray ) होते.
'उद्धव ठाकरे यांनाच सत्तेची हाव' - सामना दिलेल्या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांनी युतीचे सरकार असताना भाजपने केंद्रात तर महाराष्ट्रात शिवसेनेने लक्ष द्यावं, असं ठरलं होत हे सांगितलं. त्यावर प्रवीण दरेकर यांनी म्हटलं की, शिळ्या कढीला उत आणण्याचा आता उपयोग नाही. जुन्या गोष्टीला उजाला दिल्याशिवाय आता उद्धव ठाकरे यांना पर्याय नाही. भाजपची सुरुवातीपासून वाटचाल पाहिली तर जे काही केलं आहे ते देशासाठी, जनतेसाठी केले आहे. आम्हाला हाव असती तर मुख्यमंत्रीपद एकनाथ शिंदे यांना दिले नसते. उद्धव ठाकरे यांनी स्वतः मुख्यमंत्रीपद घेऊन मंत्रीपद सुद्धा मुलाला दिले, यावरून हाव कोणाला आहे हे दिसते. भाजप बद्दल बोलायचा अधिकार उद्धव ठाकरे यांना नाही. सत्तेची लालसा उद्धव ठाकरे यांनी ठेवली आहे. इतर पक्षातून भाजपमध्ये आलेल्यांना योग्य तो सन्मान व वागणूक दिली जाते. भाजप सर्व समावेक्षक पक्ष आहे. शिवसेनेमध्ये उदय सामंत, शंकराव गडाख, राजेंद्र यड्रावकर या बाहेरून आलेल्या उमेदवारांना मंत्री पद दिली. राजकुमार धूत, प्रियंका चतुर्वेदी यांना शिवसेनेने उमेदवारी दिली. प्रियंका चतुर्वेदी ऐवजी संजय पवार यांना उमेदवारी उद्धव ठाकरे यांनी का दिली नाही? हे अगोदर त्यांनी सांगावे, असा प्रश्नही प्रवीण दरेकर यांनी उपस्थित केला.