मुंबई - एसटी महामंडळाचे विलीनीकरण राज्य सरकारमध्ये करावे यासाठी गेले महिनाभर एसटी कर्मचाऱ्यांचा संप (ST Workers Protest) सुरू आहे. त्याचाच एक भाग म्हणून आझाद मैदानात आंदोलन सुरु आहे. केंद्र सरकार तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ज्या प्रमाणे शेतकऱ्यांबाबत निर्णय घेतला, त्याचप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांबाबत निर्णय घ्यावा, असे आवाहन विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर(Pravin Darekar) यांनी राज्य सरकारला केले आहे. पेग, पब आणि पार्टी हे राज्य सरकारचे खासगीकरणाचे पीपीपी मॉडेल असल्याची टीका दरेकर यांनी केली.
प्रवीण दरेकर - विरोधी पक्षनेते, विधानपरिषद - पेग, पब आणि पार्टी मॉडेल -
मुंबईच्या आझाद मैदानात आज एसटी कर्मचाऱ्यांकडून सरकारचे तेरावे घालण्यात आले. त्यानंतर प्रवीण दरेकर यांनी आंदोलनाच्या ठिकाणाला भेट दिली. त्यावेळी बोलताना दरेकर यांनी सरकारकडून खासगीकरणाबाबत केल्या जाणाऱ्या चर्चेवर टीका केली. एसटी कर्मचारी विलीनीकरणाची मागणी करत असताना सरकार मात्र खासगीकरण करण्याचा विचार करत आहे. पीपीपी मॉडेल म्हणजे पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप. मात्र सरकारचे पीपीपी मॉडेल म्हणजे पेग, पब आणि पार्टी आहे. सरकारला चर्चा करायची असेल तर त्यांनी मंत्रालयात करावी. मात्र सरकार खासगी कार्यालयात चर्चा करत आहे. यांची चर्चा ही पेग, पब आणि पार्टी या पीपीपी मॉडेलनुसार होते. या चर्चेत तीन पी म्हणजे शरद पवार, अनिल परब आणि अजित पवार हे उपस्थित होते, असा टोलाही दरेकर यांनी लगावला.
- सरकार पुरस्कृत हिंसाचार -
एसटी कर्मचारी आझाद मैदानात आंदोलन करत आहेत. या आंदोलनाचे नेतृत्व सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर करत आहेत. हे दोघे बहुजन समाजाचे नेतृत्व करत असल्याने त्यांची ऍलर्जी असल्याने सरकारकडून म्हणावी तशी चर्चा करण्यात येत नाही. खोत, पडळकर यांच्यासोबत चर्चा नको तर कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाशी चर्चा करा. विलीनीकरणाचा निर्णय घ्या, देवेंद्र फडणवीस व मी पैसा कसा उभा करायचा हे सांगतो, असे दरेकर म्हणाले. केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी जसा निर्णय घेतला तसाच निर्णय राज्य सरकारने एसटी कर्मचाऱ्यांबाबत घ्यावा, असे आवाहन दरेकर यांनी केले. एसटीवर होणाऱ्या दगडफेकीबाबत बोलताना सरकारकडून पुरस्कृत हिंसाचार करण्याचा घाट घातला जात आहे का अशी शंका दरेकर यांनी उपस्थित केली.