मुंबई- काही दशकांपूर्वी बीआर चोप्रा फिल्म्स ने छोट्या पडद्यावर प्रवेश केला होता. त्याआधी त्यांनी अनेक यशस्वी चित्रपटांची निर्मिती केली होती आणि चित्रपटसृष्टीत टेलिव्हिजन वर काम करणे त्याकाळी थोडे हलके समजले जायचे. परंतु रामानंद सागर यांनी केलेल्या छोट्या पडद्यावरील ‘रामायण’ या मालिकेने प्रचंड प्रसिद्धी मिळविली आणि त्यामुळेच कदाचित बी आर फिल्म्स ‘महाभारत’ छोट्या पडद्यावर घेऊन आले. मनोरंजनसृष्टीतील अनेक गाजलेली नाव याचा भाग झाली आणि अनेक नवी नावं गाजली. अर्जुन (खरं नावं - फिरोझ खान), नितीश भारद्वाज, पंकज धीर, मुकेश खन्ना, पुनीत इस्सर (ज्याच्या ‘कुली’ चित्रपटाच्या शुटिंगवेळीच्या ‘फाईट’ मुळे अमिताभ जखमी झाला होता), गजेंद्र चौहान, सुरेंद्र पाल, रूपाली गांगुली (द्रौपदीच्या भूमिकेसाठी आधी जुही चावला चे नाव जवळपास निश्चित झाले होते) आणि प्रवीण कुमार सोबती यांच्या प्रमुख भूमिका होत्या.
प्रवीण कुमार सोबती यांनी भीम हे पात्र रंगविले होते आणि त्या भूमिकेलाही, महाभारतातील इतर भूमिकांप्रमाणेच प्रेक्षकांनी डोक्यावर घेतले होते. प्रवीण कुमार सव्वासहा फूट उंच होते आणि भरदार शरीराचे मालिक होते. ते शारीरिकदृष्ट्या भीमाच्या भूमिकेत चपखलपणे बसले होते आणि रवी चोप्रा यांच्या दिग्दर्शनाखाली अभिनयही चांगला करीत होते. १९८८ सुरु झालेली ‘महाभारत’ ही मालिका १९९० पर्यन्त सुरु होती आणि त्यादरम्यान या मालिकेत काम करणारे सर्वच फेमस झाले होते. सर्वचजण भारतीयांच्या घराघरात पोहोचले. प्रवीण कुमार यांना फेमस होण्याचे आपले स्वप्न पूर्ण झाल्यागत वाटत होते. कारण ते मुंबई आले होते ते अभिनय करण्यासाठीच.