मुंबई -युतीचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील, पक्षाने आदेश दिल्याने स्वतंत्र लढायची तयारी असल्याचे भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी सांगितले आहे. गृहनिर्माण सोसायट्यांच्या मुद्यावर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदे दरम्यान ईटीव्ही भारतशी बोलताना त्यांनी स्वतंत्र लढण्याची तयारी असल्याचे स्पष्ट केले.
येत्या १७ सप्टेंबर दरम्यान विधानसभा निवडणूक घोषित होण्याची चिन्ह आहेत. मात्र, अद्यापही भाजप आणि शिवसेनेकडून जागा वाटपाचा प्रश्न निकाली निघाला नाही. राष्ट्रवादीचे भास्कर जाधव यांच्या शिवसेना प्रवेशाच्यावेळी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी अप्रत्यक्षपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाराजी व्यक्त केली होती. शिवसेनेच्या उमेदवारांची यादी ही मुख्यमंत्री करतील असे खोचक विधान ठाकरे यांनी केले होते. त्यामूळे महायुतीत आलबेल नसल्याचे चित्र समोर येत आहे.
हेही वाचा - 'वंचित'मुळे भाजपला लोकसभा निवडणुकीत फायदा - शरद पवार
एकीकडे मुख्यमंत्री महाराष्ट्रभर महाजानदेश यात्रेच्या निम्मिताने भाजपचा प्रचार करत आहेत. शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे जन आशीर्वाद यात्रेच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधत आहेत. मात्र या यात्रेत कुठेही महायुतीच्या जागावाटपाची चर्चा होत नाही. तर दुसरीकडे भाजपकडे असलेल्या मतदारसंघातील अन्य पक्षाचे नेते थेट शिवसेनेत सामील होत आहेत. त्यामुळे स्वबळाची शक्यता नाकारता येत नसल्याचे भाजपचे नेते खाजगीत सांगत आहेत.