मुंबई: एक आंतरराष्ट्रीय शहर अशी मुंबईची ओळख आहे. या मुंबईत तुम्हाला एक वेळच्या जेवणाची भ्रांत असलेल्या व्यक्तीपासून अगदी जगातील सर्वात श्रीमंत लोकांची यादीत असणारे उद्योगपती देखील पाहायला मिळतील. अशा या वेगवान शहरात अनेक जण आपले स्वप्न घेऊन येतात. काही जणांची पूर्ण होतात तर काहीजणांची अपूर्ण राहतात. यात अनेकांना कष्ट हे करावेच लागतात स्ट्रगल हा कोणाच्याही वाट्याला चुकलेला नाही. मात्र, याच मुंबईत कुर्ल्यातील मुस्लिम नागरिकांना जगण्याच्या संघर्षाबरोबरच अखेरच्या प्रवासाचा देखील संघर्ष करावा लागतोय. कारण, कुर्ला पश्चिम भागात एखाद्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास त्या व्यक्तीचे पार्थिव कुर्ला पूर्वेला असलेल्या कब्रस्तानात ( Graveyard at Kurla East ) नेण्यासाठी रस्ताच नाही. त्यामुळे इथल्या लोकांना आपल्या परिवारातील सदस्याचे पार्थिव थेट प्लॅटफॉर्मवरूनच न्यावे लागते.
प्लॅटफॉर्म वरील पब्लिक ब्रिज अंत्ययात्रेसाठी सोयीस्कर :अंत्ययात्रेत साधारण शंभरते दीडशे लोक उपस्थित असतात. ही अंत्ययात्रा फलाटावरील पदाचारी पूल चढून न्यावी लागत असल्याने खांदेकऱ्यांना ते पार्थिव तिरकं करावं लागतं व आडव्या अवस्थेत मृतदेह उचलून द्यावा लागतो. त्यामुळे काही वेळा हा मृतदेह त्या जनाजावरून खाली पडण्याची देखील भीती असते. त्यामुळे जर एखाद्या वेळी हा मृतदेह जनजावरून खाली पडल्यास मोठी दुर्घटना होण्याची देखील शक्यता असते.
मागील अनेक वर्षांपासून अशीच निघते जानाजा :या संदर्भात आम्ही मुस्लिम समाजाच्या प्रश्नांवर लढणारे सामाजिक कार्यकर्ते शेख वाजीद पानसरे यांच्याशी संपर्क केला असता ते सांगतात की, प्लॅटफॉर्म वरून प्रेतयात्रा जाणं हे इथल्या लोकांसाठी नवीन नाही. मागच्या अनेक वर्षांपासून प्लॅटफॉर्मवरून प्रेतयात्रा निघते. कुर्ला पूर्वेला असलेल्या कुरेशी नगर मधील कब्रस्तानात जाण्यासाठी कुर्ला पश्चिमेतील नागरिकांना रेल्वे प्लॅटफॉर्म वरील प्रवासी पुलाचा वापर करावा लागतो. इथं मुस्लिम समाजाची वस्ती मोठ्या प्रमाणात आहे या कुस्तीच्या लोकसंख्येप्रमाणे विचार केल्यास त्या प्रमाणात इथं कबरस्तान नाही एवढ्या मोठ्या लोकसंख्येच्या वस्तीत इथं एकच कब्रस्तान आहे.
सुन्नी समाजासाठी जवळ असलेल एकमेव कब्रस्तान :शेख वाजीद सांगतात की, कुर्ला ईस्ट आणि कुर्ला वेस्ट अशा दोन्हीकडच्या लोकांना जवळ असलेल ते एकमेव कबरस्थान आहे. सुन्नी समाजासाठी जरीमरी आणि आणखी एक कब्रस्तान आहे अशी एकूण तीन कब्रस्तान आहेत. मात्र ते अंतर खूप लांब पडतं. त्या मनाने हे कब्रस्तान आम्हाला खूप जवळ आहे. पण, तिकडे जायला सोयीस्कर असा रस्ता नाही.