मुंबई- विठूरायाचे दर्शन घेण्याच्या ओढीने देशातील विविध राज्यातून आलेले वारकरी पायी चालत पंढरपूरची वाट धरत असतात. टाळ-मृदुंगाच्या ठेक्यावर आणि ग्यानबा तुकारामाच्या जयघोषात विठुरायाचे नामस्मरण करित वारकरी विठ्ठलाच्या नामस्मरणात तल्लीन होऊन पंढरपुरात पोहोचत असतात. प्रत्येक विठ्ठल भक्ताला या विठ्ठलाचे दर्शन व्हावे असे वाटत असते. परंतु प्रत्येकालाच वारीला जाण्याची संधी मिळतेच असे नाही. त्यामुळेच मुंबईकर व शहराच्या शेजारील भक्तांना या विठुरायाचा दर्शन व्हावे यासाठी चारशे वर्षापूर्वी मुंबईत वडाळा या ठिकाणी विठ्ठलाचे मंदिर स्थापन झालेले आहे. या मंदिराला प्रती पंढरपूर देखील संबोधले जाते. या मंदिराला यावर्षी 402 वर्षे होत आहेत. या मंदिराचा इतिहास काय आहे याविषयी विश्वस्त यांच्याकडून माहिती घेत ईटीव्ही भारतचा हा विशेष रिपोर्ट...
मुंबईतील प्रसिद्ध विठ्ठल मंदिरांपैकी वडाळा येथील विठ्ठल मंदिर हे एक आहे. हे मंदिर पुरातन असुन चारशे दोन वर्षांपूर्वी उभारण्यात आल्याचे विश्वस्त सांगतात. या मंदिराच्या स्थापनेविषयीची गोष्ट ऐकण्यासारखे आहे. मुंबई सात बेटांची आहे. त्यातील वडाळा गाव हे एक बेट होते. तेव्हा वडाळा गाव हे मिठागरासाठी प्रसिद्ध होते. या मिठागरात ब्राह्मण, लमानी, शेतकरी व कोळी-आगरी अशी अनेक लोक राहत होते. मिठाचा व्यापार करणे हा त्या परिसरातील लोकांचा व्यवसाय होता. व्यापार करणारे व्यापारी हे विठ्ठलाचे आणि तुकारामचे भक्त होते. ते नित्यनेमाने पंढरपूरच्या वारीला जात असतं. एका वारीत पंढरपूरला गेले असताना स्नान करताना त्यांना एक दगड दिसला. तो दगड पंढरपुरातून त्यांनी वडाळा गावात घेऊन आले. जेथे तळ होते त्या ठिकाणी ते दगड ठेवून विठ्ठल - रखुमाई चे मंदिर स्थापन केले. आणि मुंबईतील व मुंबई शेजारील शहरातील ज्यांना पंढरपूर येथे जाणे शक्य होत नाही त्यांच्यासाठी हे मंदिर एक प्रतिपंढरपूर म्हणून उभे केले.