मुंबई- शिवसेना आमदार प्रताप सरनाईक यांची ईडीकडून तब्बल सहा तासांहून अधिक वेळ चौकशी करण्यात आली आहे. माझ्या दिलेल्या उत्तरावरून अधिकाऱ्यांचे समाधान झाले की नाही हे मला माहीत नाही. कर्तव्य पूर्ण केल्याची प्रतिक्रिया सरनाईक यांनी माध्यमांशी बोलताना दिली. टॉप्समधील घोटाळ्यावर कारवाई करावी, अशी लोकप्रतिनिधी म्हणून मागणी केल्याचेही त्यांनी सांगितले.
ईडीच्या अधिकाऱ्यांची चौकशी पूर्ण झाल्यानंतर आमदार प्रताप सरनाईक कार्यालयाबाहेर आले. यावेळी माध्यमांशी बोलताना सरनाईक म्हणाले, की लोकप्रतिनिधी म्हणून ईडी अधिकाऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे मी दिलेली आहेत. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात ही चौकशी झाली आहे. अधिकाऱ्यांनी मला माझ्या कुटुंबाविषयी, माझ्याविषयी , माझ्या व्यवसायविषयी व राजकीय प्रश्न विचारले होते. यांची माहिती अधिकाऱ्यांना दिल्याचे सरनाईक यांनी स्पष्ट केले.
टॉप्समध्ये घोटाळा झाला असेल तर आरोपींना शिक्षा करावी, अशी मागणी लोकप्रतिनिधी म्हणून ईडीकडे केली आहे. ईडीने पुन्हा चौकशीसाठी बोलाविले नाही. मात्र, ईडीला नोटीस देण्याची गरज नाही. साधा फोन किंवा ई-मेल केला तरी चौकशीला हजर राहू, असे सांगितल्याची माहिती सरनाईक यांनी दिली.
हेही वाचा-संसदेच्या नव्या इमारतीचा भूमिपूजन सोहळा संपन्न... पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली पूजा