महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

प्रताप सरनाईकांचे पत्र हे शिवसेना आमदारांमधील अस्वस्थता उघड करणारे - प्रवीण दरेकर - प्रवीण दरेकर यांची शिवसेनेवर टीका

प्रताप सरनाईकांचे मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र हे शिवसेनेच्या अंतर्गत आणि महाविकासआघाडीच्या अंतर्गत नेमके काय चालले हे दाखवणारे पत्र आहे. शिवसेना आमदारांमध्ये अस्वस्थता आहे, अशी प्रतिक्रिया विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी दिली.

pravin darekar latest news
प्रताप सरनाईकांचे पत्र हे शिवसेना आमदारांमधील अस्वस्थता उघड करणारे - प्रवीण दरेकर

By

Published : Jun 20, 2021, 8:51 PM IST

Updated : Jun 20, 2021, 10:39 PM IST

मुंबई –शिवसेना आमदार प्रताप सरनाईकांचे मुख्यमंत्र्यांना लिहिलेले पत्र हे शिवसेनेच्या अंतर्गत आणि महाविकासआघाडीच्या अंतर्गत नेमके काय चालले हे दाखवणारे पत्र आहे. शिवसेना आमदारांमध्ये अस्वस्थता आहे. तसेच तळागाळातल्या शिवसैनिकांमध्ये नाराजी आहे, हे यामधून स्पष्ट दिसत असल्याची प्रतिक्रिया विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी दिली.

'सत्तेचा पुरेपूर उपयोग काँग्रेस-राष्ट्रवादी घेते आहे'-

महाविकास आघाडीचे सरकारमध्ये शिवसेना सत्तेतील प्रमुख पक्ष असून त्यांच्याकडे मुख्यमंत्रीपद आहे. शिवसेनेची सत्ता असली तरी सत्तेचा उपयोग शिवसेनेला होत नसून या सत्तेचा पुरेपूर उपयोग काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस करून घेत असल्याचे स्पष्ट होत आहे. मग अशा सत्तेचा उपयोग काय, असा सवाल उपस्थित करुन आमदार सरनाईक यांनी फक्त एकट्या शिवसेना आमदाराचे नव्हे, तर शिवसेनेतील सर्वच आमदरांची वस्तुस्थिती उघड केल्याचेही यातून स्पष्ट होते, असेही दरेकर म्हणाले. आमदार सरनाईक यांच्या पत्राच्या माध्यमातून 25 वर्षे भाजप सोबतची युती, पाच वर्षे देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारच्या काळात आमदारांना मिळालेली वागणूक तसेच झालेला विकास या सगळ्यांचा तुलनात्मक आलेख समोर येत आहे, असेही ते म्हणाले.

'संजय राऊत यांनी पत्रातील एकच पॅरा वाचला' -

शिवसेना नेते संजय राऊत यांना आपल्या पक्षातील आमदारांनी पत्राद्वारे दिलेल्या शिवसैनिकांच्या भावना महत्त्वाच्या वाटत नाहीत. तर त्यांनी फक्त त्या पत्रातील एकच पॅरेग्राफ सेंट्रल एजन्सीच्या मार्फत होणाऱ्या त्रासाच्या संदर्भात वाचला. यापेक्षा शिवसेनेचे दुसरे दुर्दैव असू शकत नाही, असे सांगतानाच दरेकर म्हणाले की, या पत्रात राष्ट्रवादी आणि महाविकास आघाडीच्या नाराजी संदर्भात आहे. संजय राऊत शिवसेनेची काळजी घेतात की राष्ट्रवादीची काळजी घेतात, हे महाराष्ट्रातील जनतेला पूर्ण माहिती आहे. पण शिवसेनेचे बदललेले स्वरूप संजय राऊत सारखा नेत्यांच्या माध्यमातून पुन्हा अधोरखीत झाले आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

पुण्यातील गर्दीला उपमुख्यमंत्री जबाबदार -

दरम्यान, पुणे येथे काल झालेल्या कार्यक्रमातील प्रचंड गर्दीला स्वतः उपमुख्यमंत्री अजितदादा पवार जबाबदार आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधातही गुन्हा दाखल करा, अशी मागणी विधानपरिषदेतील विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर यांनी केली. कालच्या पुण्यातील कार्यक्रमाच्या गर्दीत केवळ 150 नाही तर सुमारे 5 हजार कार्यकर्ते उपस्थित होते, त्यामुळे फक्त १५० कार्यकर्त्यांवरच गुन्हा दाखल का करण्यात आला, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

हेही वाचा -काँग्रेस निवडणुका स्वबळावर लढवणार, आघाडी कायमस्वरुपी नाही - पटोले

Last Updated : Jun 20, 2021, 10:39 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details