मुंबई- राज्यातील ओबीसी समाजाच्या आरक्षणात कोणत्याही इतर समाजाच्या नेत्यांनी ढवळाढवळ करण्याचा प्रयत्न करू नये. तसेच ओबीसीमध्ये आरक्षण मागण्याचा प्रयत्नही करू नये. अन्यथा ओबीसी समाज रस्त्यावर उतरेल, असा निर्वाणीचा इशारा धनगर समाजाचे नेते प्रकाश शेंडगे यांनी आज ' ईटीव्ही भारत'शी बोलताना दिला.
मराठा समाजाने ओबीसीमध्ये आरक्षण मागू नये, याच मागणीसाठी आज 'ओबीसी आरक्षण बचाव' या नावाने महाराष्ट्र राज्य समता परिषदेकडून मुंबईत मोर्चा काढण्यात आला होता. यासोबतच राज्यभरातील विविध ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. ओबीसी आरक्षणामध्ये मराठी मराठा समाजाने कोणतीही मागणी करू नये, अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.
हेही वाचा-...तर लढण्यासाठी पुन्हा एकत्र यावं लागेल - छगन भुजबळ
राज्यात 8 डिसेंबर रोजी मराठा क्रांती मोर्चाकडून राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. या आंदोलनातील अनेक नेत्यांनी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण द्यावे , अशी मागणी केली आहे. या आंदोलनामुळे राज्यात ओबीसी आणि मराठा समाजात दुफळी निर्माण होऊ शकते. त्यामुळे पार्श्वभूमीवर सरकारने या आंदोलनाला राज्यात कुठेही परवानगी देऊ नये, अशी मागणी धनगर समाजाचे नेते प्रकाश शेंडगे यांनी केली. आम्ही 5 डिसेंबरला औरंगाबाद येथे एका परिषद आयोजन आहे. या परिषदेमध्ये या विरोधातील रुपरेषा आम्ही ठरवणार असल्याचेही शेंडगे म्हणाले.