मुंबई -राज्यात तसेच मुंबईत कोरोना विषाणूच असलेला प्रसार, जगभरात काही देशात आढळून आलेला ओमायक्रॉन या विषाणूच्या नव्या व्हेरियंटमुळे (Omicron Variant) डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी (Dr Babasaheb Ambedkar Mahaparinirvana Day) ऑनलाईन अभिवादन करावे, असे आवाहन सरकारकडून करण्यात आले होते. मात्र, या उलट भूमिका आंबेडकरी नेते आनंदराज आंबेडकर आणि जोगेंद्र कवाडे (Jogendra kawade) यांनी घेतली होती. आंबेडकरी अनुयायांना येण्यापासून रोखल्यास लाखोंच्या संख्येने अनुयायी चैत्यभूमीला (Chaityabhoomi) येतील, असा इशारा देण्यात आला होता. यानंतर महानगरपालिकेने चैत्यभूमी (Chaityabhoomi) येथे येण्यास आंबेडकरी जनेतला परवानगी असेल, असे आदेश काढले. मात्र, या संदर्भात आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (VBA Leader Prakash Ambedkar) यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. कोरोनाच्या नव्या व्हेरियंट बद्दल अंदाज कोणालाही आलेला नाही, अशा परिस्थितीत आंबेडकरी अनुयायांनी चैत्यभूमीवर येणे टाळावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.
काय म्हणाले प्रकाश आंबेडकर -
६ डिसेंबर रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी मुंबईला यावे की नाही, अशी विचारणा केली जात आहे. सध्या रेल्वे पूर्णपणे चालू झालेली नाही. एसटीचा ही संप सुरू आहे. सोबतच कोरोनाच्या नव्या व्हेरियंट (Omicron Variant) बद्दल अंदाज कोणालाही आलेला नाही, अशा परिस्थितीत आपण येणे टाळावे. आपण ज्या ठिकाणी आहोत. त्या ठिकाणाहून बाबासाहेबांना मानवंदना देण्याचं काम करूया. सोबतच आंबेडकरवादी राजकीय पक्षालाच आम्ही तारण्याचं काम करू आणि आंबेडकरी पक्षाच्या उमेदवारालाच मतदान करु हा संकल्प सगळ्यांनी करूया, असे आवाहन आंबेडकर यांनी केले आहे.