मुंबई - डॉ. नरेंद्र दाभोलकरांच्या हत्येला ७ वर्षे पूर्ण झाली. मात्र, आरोपींचा आणि या कटाच्या मास्टरमाईंडचा अजूनही शोध लागलेला नाही; तो लागणारही नाही, अशा आशयाचे ट्विट प्रकाश आंबेडकर यांनी केले होते.
आत्ताच्या सरकारमधील नेत्याचा दाभोलकर हत्येत सहभाग...पाहा काय म्हणाले प्रकाश आंबेडकर राज्यात सेक्युलर सरकार आलंय असे म्हणतात. पण,आम्हाला शंका आहे की, या सेक्युलर सरकारमधील एका मोठ्या व्यक्तीने त्यावेळी हे प्रकरण दाबले होते, असा खळबळजनक आरोप आंबेडकरांनी केला होता. याबाबत त्यांनी 20 ऑगस्टला ट्विट केले; आणि पुन्हा राजकीय चर्चेचा विषय ठरला. मात्र, काल पत्रकार परिषदेत त्यांना यासंदर्भात विचारल्यानंतर अजूनही ट्विट काढले नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यांचा नक्की कोणाकडे रोख होता, हे विचारल्यावर संबंधित व्यक्तीचे नाव घेणे त्यांनी टाळले.
समस्त पुरोगामी मंडळींना माझे सांगणे आहे की, ही लढाई न्यायालयीन नसून राजकीय आहे. त्यामुळे यापासून तुम्हाला पळता येणार नाही. इथल्या संत परंपरे विरुद्ध वैदिक परंपरेचे हे राजकीय युद्ध आहे, असे आंबेडकर म्हणाले.
दरम्यान, विवेकवादी कार्यकर्ते आणि महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा खून सात वर्षापूर्वी (20 ऑगस्ट 2013) रोजी झाला होता. या हत्येमुळे पुरोगामी चळवळीचे मोठे नुकसान झाले. डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या खुनाच्या तपासात दिरंगाई होत आहे, यावर सरकारविरोधात तीव्र रोष पुरोगामी, डाव्या, आंबेडकरी चळवळीत निर्माण झाला आहे. अद्याप आरोपींचा शोध घेण्यात आणि त्यांना अटक करण्यात तपास यंत्रणांना अपयश आले आहे. सीबीआयकडे तपास सोपवल्यानंतर देखील या प्रकरणाचा छडा अद्याप लागला नाहीय. यानंतर गौरी लंकेश, कलबुर्गी, गोविंद पानसरे यांची देखील हत्या झाली होती. हिंदू सनातन्यांचा यामध्ये सहभाग असल्याचा आरोप कायम होतो. मात्र, अद्याप सर्व प्रकरणे गुलदस्त्यात आहेत.